Sunday, August 31, 2008

मी...शोधते काही बकरे!

निवांतवृत्तीने मी एकदा वॉलमार्टातून खरेदी करत असताना, हे देसी कुटुंब स्वत:हून माझ्यापुढे येवून थांबलं, आणि गप्पा मारायला लागलं. मला कोण आनंद झाला होता. :-) मी "अमक्याची तमकी" का? अशा प्रश्नाने गृहस्थांनी सुरुवात

केली. मी "नाही" म्हटले, पण त्यामुळे काही फ़रक पडला नाही, आणि आम्ही पुढे ओळख वाढवायच्या गप्पा सुरु ठेवल्या. त्या ओळख निघण्याचा 'रॉंग-नंबर' निघाल्यानंतरही हे कुटुंब प्रेमाने पुढे बोलत राहिल्याने, आणि त्यांनी मला 'कट' न मारल्याने मला फ़ार बरं वाटलं होतं!

मग यथासांग फोन नंबर आणि इ-मेल ऍड्रेसेस चे आदानप्रदान करून आम्ही निरोप घेतले. दुसऱ्या दिवशी त्यांचा स्वत:हून मला फोन आणि इ-मेल ही आले! मला त्यांची आत्मियता पाहून फ़ार भरून आलं होतं. (तसं त्यांनी मला बोलावण्या ऐवजी "आम्ही येतो" असं म्हणणं वेगळं वाटलेलं, पण ते आश्चर्य मी लगेच झटकून टाकलं.) ते कुटुंब आल्यावर कसं स्वागत करायचं याचे बेत सुरु केले. ठरल्या वेळेच्या आधीपासून मी वाट पाहिलेली, आणि कांदा-पोहे; आलं घातलेला चहा (हे काही फ़ार नाही, तरी) मनापासून केलेलं. ते आले, गप्पा झाल्या. मला नवे मित्र-मैत्रीण मिळाल्याचा फ़ार आनंद झाला होता.

मग त्याने एम.बी.ए. केल्यावर इथे मान्यवर कंपनीत नोकरी करता-करता कसा स्वत:चा बिझनेस सुरु केलाये हे सांगितलं. इथे असे सुमारे १५० देसी सोबत मिळून हा इ-कॉमर्स चा बिझनेस करत आहेत, आणि यातले सगळे आय.आय.टी., आय.आय.एम. अशा मान्यवर संस्थेतून उच्च शिक्षण घेतलेले आहेत, हे कळलं.

मला लय भारी वाटत होतं. अमेरिकेत येवून शिकून, नोकरी करून, मग स्वत:चा बिझनेस सुरू करून करोडपती झालेल्या देसींच्या सुरस आणि चमत्कारिक कथा मी ऐकलेल्या, वाचलेल्या होत्या. अशाच भारलेल्या १५० जणांच्या ग्रूपच्या एकाशी मी प्रत्यक्षात बोलत होते! आपल्यालाही किती काही यांच्याकडून शिकायला मिळेल या स्वप्नांत मी लगेच रमले. आश्चर्याची गोष्ट
अशी, की त्यांनी लगेच मला १५१ वी पार्टनर बनण्याची ऑफ़र दिली, आणि एका मीटिंगलाही बोलावलं. :-)हरखून जाणं काय असतं ते मी अनुभवत होते.

मीटिंगमध्ये त्या कंपनीचा प्रमुख प्रेझेंटेशन देणार होता. मी माझा एकुलता एक अती-फ़ॉर्मल ड्रेस धुवून इस्त्री करून घालून तयार झाले. आम्ही सोबत तिथे गेलो. एका देसी च्या फ़्लॅट मध्ये अनेक देसी जमून एकमेकांशी अतिशय आदबीने बोलत उभे होते. मग प्रेझेंटेशन सुरु झालं. प्रमुखाने बिझनेस म्हणजे काय, तो कसा करावा, त्यातले प्रमुख धोके काय, अशी छान सुरुवात केली.

माझ्यासारख्या निर्बुद्धला असं बेसिकपासून समजावून सांगणारे फ़ार आवडतात. मी लक्षपूर्वक ऐकत होते. मग त्याने बिल गेट्स श्रीमंत कसा झाला, आपण कसे आणि का व्हावे हे खुसखुशीत उदाहरणांसह सांगितले. विनोद बरे होते. पण नर्म विनोदांनाही मागच्या रांगेतून खूप (तरीही आदरयुक्त) हशा आणि टाळ्या मिळत होत्या. (मला पुढे बसवण्यात आले
होते.) आम्ही पुढचे २०/२५ जण मात्र माफ़क हसत होतो. मग प्रमुखाने इ-कॉमर्स म्हणजे काय, आणि २०० डॉलर्स च्या भांडवलानेही हा व्यवसाय कसा सुरु करता येतो हे सांगायला सुरुवात केली. आता आम्ही पुढचे सरसावून बसलो. (मागून वाहवा चालूच.) २ स्लाईड्स नंतर प्रमुख मुद्द्यावर आले. आणि एक ई-बे, ऍमॅझॉन सारखे ऑनलाईन-शॉपिंगचे पोर्टल आहे,
त्याचा टेक्निकल पार्ट करून तयार आहे, मॅनेजमेण्ट इन-प्लेस आहे. पण या पोर्टल ला जाहिरातीवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत, म्हणून त्यांनी ह्या (आणि अशा अनेक) १५० बिझनेसमन्स (आणि वूमेन्स) ना काम सोपवलं आहे, प्रत्येकाने १० नवीन बिझनेसमन / वूमेन मिळवायचे, मग त्या १० नी पुढचे १००. आता ह्या सर्व मेंबर्सनी त्या वेबसाईट वरून जेवढे जमेल तेव्हढे शॉपिंग करायचे, म्हणजे त्यांचे बोनस पॉईंट वाढतील. आणि मग तुम्ही सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम मेंबर होत जाल.

ह्या स्लाईड नंतर माझा मूडच गेला. सिनेमातली हिरॉईन जशी कुंकू पुसून टाकते, तसं मला लिपस्टिक पुसून, इन केलेला शर्ट उपसून, अंगावरच्या कपड्यांना चुरगळून त्यांची इस्त्री घालवायची तीव्र इच्छा झाली. प्रेझेण्टेशन झाल्यावर सर्व प्लॅटिनम मेंबर्स चा सत्कार झाला. त्यात मला भेटलेले सद्कुटुंबही होते. शेवटी एक डी.व्ही.डी. दाखवण्यात आली, ज्यात ह्या बिझनेसच्या मर्गाने श्रीमंत झालेल्या एका देसी कुटुंबाचा आलीशान महाल आणि गाड्या आतून-बाहेरून दाखवण्यात आल्या. ते पाहून आम्हीही प्रेरित व्हावं असा उद्देश असल्याचं ऐकून मला भडभडून ओकारी येत होती (पण तिथे बादली ठेवलेली नव्हती, आणि उगाच दुसऱ्याच्या हॉलमधे नको म्हणून मी मोट्ठा आवंढा गिळला.) सर्व झाल्यावर इन्फ़ॉर्मल गप्पांच्या वेळी कळाले, की मागे बसलेले आधीच बिझनेस मन / वूमन होते. पुढे बसलेले २०/२५ जण नुकतेच देस सोडून इथे आलेले होते. त्यातला एकही २ महिन्यांपेक्षा इथे जुना नव्हता. आणि सर्वांना बागेत / स्टेशनवर / वॉलमार्टमधे / दुकानांत प्रेमळ देसी कुटुंबे भेटली होती! प्रेझेण्टेशन नंतर या सर्व २५ जणांचे चेहेरे मागे एकदा सांगलीतल्या एका खाटिकखान्यात पाहिल्यासारखे वटायला लागले होते. सर्व सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम बिझनेसमन एकमेकांची तारीफ़ करताना थकत नव्हते. "तुम्हाला इथे कोण घेवून आलं?" या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं, तरी "वा! डोण्ट वरी! यू आर इन सेफ़ हॅण्ड्स" असं उत्तर मिळत होतं. सर्वांच्या चेहेऱ्यावरचे भाव इतके तुपकट आणि आर्जवी होते की मी एखाद्या साधुबुवाच्या आश्रमात आले आहे असं वाटत होतं. तोच सद्भाव, तोच आदर,
तीच दृढश्रद्धा.

असा बिझनेस जॉईन करण्यापेक्षा कारकूनी बरी हा माझा विचार पक्का होता. कुणाचे घरच्या अडचणींनी, किंवा कुवत कमी असल्याने, शिक्षण कमी झाले असेल, अशा व्यक्तीने अशी एजन्सी घेवून ४ पैसे कमावले, तर मी त्याचं कौतुकच करते. कांना भेटणे, नेटवर्क वाढवणे, आणि पैसे कमावणे हे वाईट नाही. पण भारतातून लाखो रुपयांच्या सबसिड्या मिळणाऱ्या मोठ्या संस्थांमधून शिक्षण घेतलेले हे उच्चविद्याविभूषित देसी परदेशात एकीकडे मानाची नोकरी करत असताना, फ़क्त आणखी पैसे मिळावेत म्हणून अशा एजन्स्या घेवून सेल्समन सारखं काम करतात, स्वत:ला बिझनेस मॅन, वूमन म्हणवून घेतात; आणि वॉलमार्टमध्ये नवख्या दिसणाऱ्या देसीना पकडून बकरे बनवतात, ह्या विचारांनी भणभणायला झालं.

माझे परममित्र सद्कुटुंब आता मला घरी सोडवायला येणार, तर मी हसून "नको, मी जाते" असं म्हटलं. समक्ष, किंवा फोनवर "नाही" म्हणायचा सडेतोडपणा अजून माझ्यात आलेला नसल्याने, मी नम्रपणे इ-मेल ने सद्कुटुंबाला कळवलं, "मी आयुष्यात कधी बिझनेस केला, तर त्यातून माझ्या अपेक्षा असतील की, (१) बिझनेस करताना त्या ह्यूज चॅलेंजला सामोरं
जाण्याची एक्साईटमेण्ट, (२) माझ्या शिक्षणाचा आणि कमावलेल्या स्किल्सचा लागणारा कस (३) माझ्या आल्मामेटर (शिक्षण-संस्था) ची गर्वाने मान उंच होणे (४) आणि थोडे पैसेही मिळणे (अगदीच आतबट्याचा व्यवहार व्हायल नको, इतपत).

तुमच्या इ-कॉमर्स च्या बिझनेस मधे यातले पहिले ३ फ़ायदे नसल्याने मी तो करू शकणार नाही, मला कृपया क्षमा करावी." इ-मेलच्या उत्तरात सद्कुटुंबाने कधी इ-मेल किंवा फोनही केला नाही.

त्यांनी लगेच गाडीने वॉलमार्ट गाठले असावे!

मी मात्र इ-मेल पाठवल्यावर मोट्ठा सुस्कारा सोडला... मनात आलं, मी जर हा बिझनेस जॉईन केला असता, आणि ह्याचे डिटेल्स कळवले असते, तर माझ्या तिशीला झुकलेल्या वयाची, किंवा आजूबाजूच्या लोकांची तमा न बाळगता, वालचंदच्या कॉम्प्युटर डिपार्टमेण्टच्या आमच्या देसाई बाईंनी माझ्या कानफ़टाखाली ज्जाळ काढला असता!

- अनामिका

Tuesday, August 26, 2008

आमच्या घरी चोरी?

अमेरिकेला येऊन महिना झाला. धाकटया लेकाच्या व सूनबाईच्या संसार वेलीवर पहिल्या वहिल्या गोजिरवाण्या कलिकेचं, सुहानाचं आगमन झालं. नातीच्या कौतुकात, तिचे लोभसवाणे अविर्भाव निरखण्यात दिवस कसे पाखरासारखे उडून जात होते. येवढंसं चिमणं लेकरू अवघ्या घरादाराला झुलवत होतं.नेमाने, श्री. नानांची खुशालीची, घराच्या देखरेखीसंबंधी व यवतमाळच्या इतर बातम्यांची मेल येत होती. श्री. नाना व सौ. वहिनी, म्हणायला आमचे शेजारी. पण कुटुंबातला जिव्हाळ्याचा, नातेसंबंधातला माणूस करणार नाही, एवढी आस्थेवाइक विचारपूस व अत्यंत मनापासून सर्वतोपरी मदत असायची त्यांची आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी सहजसुलभतेने. मदत घेणाऱ्यालाच संकोच वाटावा. एवढे करूनही पुन्हा आपण त्या गावचेच नाही, अशी निरलस वागणूक. त्यांच्याच भरवशावर आम्ही आमचे घर सोडून आलो होतो, असे म्हणणे वावगे ठरू नये.अचानक एक दिवस, त्यांची मेल आली, की तुमच्या घरी चोरी झालीये. उन्हाळ्याचे दिवस.


सगळ्यांकडे दुपारी, रात्रीही कुलर सुरू. दरवाजे बंद व उन्हामुळे सगळीकडे सामसूम. एरवीही चोऱ्यांचे प्रमाण वाढलेलेच. पण उन्हाळ्यात विशेष वाटते. शिवाय नाही म्हटले, तरी अमेरिकेला जाणार म्हणून अनेक दिवसांपासून आमची जाहिरातही लागलेली होतीच. घर, खिडक्‍या सतत बंद, फाटकाला निरंतर कुलूप व सर्वत्र सामसूम म्हटल्यावर चोरांचे आयतेच फावणार. लग्न, समारंभानिमित्त चार-आठ दिवसही लोक घर बंद करून जायला घाबरतात. आम्ही तर सहा महिने मुक्कामाला आलो आहोत.आपले घर सुरक्षित राहावे, अशी कितीही मनापासूनची इच्छा असली, तरी "मन चिंती ते वैरी न चिंती' म्हणतात, तशी मनात धाकधूक होतीच. त्यामुळे ही बातमीही तशी अनपेक्षित आणि म्हणून तितकीशी धक्कादायक नव्हती, असे मनाचे समाधान करून घेतले.


अमेरिकेला जाताना घरी जास्त जोखमीचे व किमती सामान ठेवायचे नाही म्हणून शक्‍यतेवढी सर्व काळजी घेतली होतीच. महत्त्वाचे पेपर्स, टी.व्ही., कॉम्प्युटरसारख्या वस्तू, चांदीची भांडी व दागिने इ. घरात काही नव्हतेच. हे सगळे खरे असले, तरी बायकांचे मन ते. एवढासा चमचा किंवा रोज वापरातली वाटी दिसली नाही, तर शोध लागल्याशिवाय गप्प बसणारा नाही स्त्री स्वभाव. मीही अपवाद नव्हतेच. क्षणात असंख्य विचार मनात डोकावून गेलेत. संसाराला सुरवात केल्यापासूनचा चाळीस, बेचाळीस वर्षांचा काळ एखाद्या चित्रपटासारखा मनश्‍चक्षूंपुढून सरकला. मनाच्या टिपकागदाने टिपलेल्या असंख्य कडू, गोड स्मृतींनी मनात फेर धरला.सहज खिडकीशी आले. समोर मेपलच्या झाडावर गेल्या काही दिवसांपासून एका पक्षाचे घरटे बांधणे सुरू होते. पिलांचा आज आवाज येत नव्हता. मनात आले, काडी काडी करून मेहनतीने चिमणी (त्या पक्षाचे नाव माहीत नसल्याने मी चिमणीच म्हणत असे) घरटे बांधते. पण पिलांचे संगोपन झाले, पिलांनी घरट्याबाहेर पंख पसरले, की निर्विकारपणे ती घरट्याचा निरोप घेते. एवढ्याशा चिमण्या पाखरांचेसुद्धा मन किती मोठे. निर्मोही.आपण मात्र एवढी वर्षे संसार केला. वयाची बासष्ट वर्षे सगळ्या हौशी, मौजी झाल्यात; तरीही लोभ सुटत नसावा ना? मुले कर्ती झालेली आहेत. सुविद्य, कर्तबगार सुना आहेत. सगळे आपापल्या संसारात रमले आहेत. नाव, पैसा, गाड्या सगळे वैभव आहे. कुशाग्र बुद्धीचा नातू व चिमुकली नात आहे. आमचे उभयतांचे आजवरचे आयुष्य आनंदात व वैभवात गेले आहे. कसलीही चिंता नाही.


घरी चोरी झाली, एवढीच बातमी कळली होती. भामटयांनी कशा, कशावर हात मारला, हे अद्याप कळलेच नाहीये. माझं मन कधीच यवतमाळला पोहोचलं. चोरीला काय काय गेलं असेल? खूप गोड असली, तरी ह्यांच्या औषधांच्या कपाटातली औषधं चोरांना आवडणार नाहीतच. त्यामुळे ती सेफ आहेत. पेट्या मागून पेट्या चोरांनी खूप अपेक्षेने उघडल्या तरी त्यातून सगळी जाडजूड पुस्तके बघूनच ते चक्रावतील. त्यात त्यांना इंटरेस्ट वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याजवळ पुस्तके वाचण्याइतका वेळही कुठे असणार? उरला प्रश्‍न भांड्या-कुंड्यांचा. ती चोर महोदयांच्या कामी येऊ शकतील. विकताही येतील म्हणून कदाचित त्यांची संख्या बरीच रोडावेल. बरेच झाले की काम कमी होईल. भांडी घासणारी मोलकरीणही खूश.सगळ्या खोल्यांमधून मनाने भटकून आल्यावर मला खूप हलके हलके वाटू लागले. आपल्याला फारसे वाईट वाटले नसल्याचेही लक्षात आले. घरातला बराच पसारा कमी होणार आहे. आपल्या गरजाही सीमित होतील. नाहीतरी हल्ली आवरशक्तीही कमीच झाली होती. मेंटेनन्स तरी कुठे नीट होणार होता पुढे पुढे! हळू हळू शरीरासारखी मनालाही निवृत्तीची ओढ लागलीच आहे ना?


आटोपशीर संसार, इतर आवडीच्या कामाकरता थोडा जास्त वेळही देता येईल. अरेच्या, चोरीच्या निमित्ताने छानच संधी आली आहे की, पोथ्या- पुराण, कीर्तन, प्रवचन यांनी साधली नसती असी निर्मोही अवस्था. निवृत्तीचा सूर चोर महोदयांनी दाखवून दिला आहे. खरं तर आभारच मानायला हवेत या शविर्लकांचे.आले अलिप्ततेने स्वतःच्या घरट्याचा निरोप घेणारी चिमणी व दुसऱ्याच्या घरावर डाका घालूनही तत्त्वज्ञान शिकवणारा चोर, कोणाला गुरू मानायचे? कोणाचे योगदान मोठे? तुम्हाला ठाऊक आहे उत्तर? असल्यास जरूर कळवा.

- अनिता महाबळ

घारपुरे, तुम्हाला काय कळतंय?

आपलं नाव पोपटराव.

आपलं म्हणजे माझं, तुमचं नव्हे. मी माझा उल्लेख आदरार्थी अनेकवचन वापरून केला यावरून तुम्हाला असं वाटेल, की आम्ही कोण्या बड्या राज(कारणी) घराण्यात जन्मलो आहोत; पण तसं काही नाही. आम्ही आमच्या हिमतीवर मोठे झालो आहोत. आम्ही आमदार नाही; पण आमदार निवास रूम नं. १७५६ मध्ये गेली पंधरा-सोळा वर्षं राहतो. आमदार, खासदार आणि मंत्रालयाशी संधान बाळगून आहोत त्यामुळे आम्हाला थोडी पावर प्राप्त झाली आहे.



उभ्या महाराष्ट्रातलं कोणतंही काम आम्हाला सांगा, कमिशन काढा की काम फत्ते! आम्ही म्हणजे प्रत्येक अडचणीवर मात करणारा उड्डाणपूलच आहोत. तुम्ही आम्हाला ओळखलं असेलच. या पोपटराव एजंटाच्या जीवनावर पुरुषोत्तम बोरकरांनी कादंबरी लिहिलेली आहे. तेवढाच आमचा आणि वाङ्‌मयाचा संबंध! बाकी वाचन वगैरे करून आपण सालं असं लाइफ बरबाद करीत नसतो. कोण कुणाला लागू झाला हे सांगायला दोनदोनशे पानं काय खरडतात हे लोक कुणास ठाऊक? आमचं म्हणजे एकीकडे अरबी समुद्र - दुसरीकडे चरबी समुद्र. आपण डायरेक्‍ट ऍक्‍शनवाले. आपल्याकडे फालतू घालवायला टाइम नाही. मेसमध्ये स्वयंपाक करते तो पक्षी आपण हेरला- सरळ जाऊन भिडलो. बास्स. दोन दिवसांत काम फत्ते आणि हे आपले कविता करताहेत. हॅट साला! "मराठी लेखकांचं अनुभवविश्‍व फारच तोकडं आहे,' असं कोणी म्हणाला तर त्यात काही वावगं आहे, असं मी म्हणणार नाही याची शक्‍यता नाकारता येणार नाही. काय? कळलं की नाही?



आम्ही राजकारणी एजंट- पुढाऱ्यांकडून शिकणार - म्हणजे असंच कोड्यात बोलणार आणि पब्लिक टाळ्या वाजवणार. ठरलेलंच समीकरण आहे ते. आमच्या बोलण्यात आणि वाङ्‌मयात एक प्रकारचं साम्य आहे. बऱ्याच वेळा दोन-चारशे पानं मजकूर वाचूनसुद्धा लेखकाला नक्की काय म्हणायचं आहे याचा पत्ता वाचकाला लागत नाही. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांचा संबंध जवळचा आहे. पब्लिकला गोंधळात टाकणं व नंतर आपल्याला हवी ती वाट दाखवणं (किंवा वाट लावणं) हे समान सूत्र आहे; पण दुर्दैवानं सध्या मात्र वातावरण गढूळ झालं आहे आणि दोहोतलं सख्य कमी व्हायला लागलं आहे. तर या प्रकरणाचा तपास लावायचं काम आमच्या आमदारांकडे, पर्यायानं आमच्या गळ्यात येऊन पडलं आहे.



भानगड अशी आहे, की कॅलिफोर्नियात राहणारे श्री. घारपुरे आणि त्यांचे काही मित्र यांच्या डोक्‍यात खूळ भरलं, की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकत भरवायचं ! झालं, त्यांनी एक प्रस्ताव तयार केला आणि अ. भा. मराठी साहित्य महामंडळाकडे पाठवून दिला. मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी हा प्रस्ताव प्रचंड बहुमतानं मान्य झाल्याचं जाहीर केलं. काही लोकांनी हे "ठाले-पाटील' कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला. काही लोकांनी ठाले-पाटील की ढाले-पाटील याची चौकशी केली. पूज्य बाळासाहेबांनी आपण "असल्या' (म्हणजे "साहित्य') संमेलनांना जात नसतो, असं जाहीर केलं.



ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांनी "दक्षिण ध्रुवावर संमेलन घ्या' असा प्रस्ताव मांडला. लेखक आणि प्रकाशक यांनी अमेरिकेतलं साहित्य संमेलन म्हणजे कंपूबाज लेखकांची पिकनिक आहे, हा फार्स आहे, हा कृतघ्नपणा आहे, अशा तऱ्हेची टीकेची झोड उठवली. मधू मंगेश कर्णिक यांनी "इंद्राय स्वाहाः तक्षकाय स्वाहाः' या न्यायाने महामंडळच बरखास्त करून नवीन संघटना निर्माण करावी, रत्नागिरीला समांतर साहित्य संमेलन भरवावं, अशा सूचना केल्या. एकूण पाहता जनतेत प्रक्षोभ उसळला आहे. नाही म्हणायला सुमारे सत्तर लोकांनी महामंडळाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. (यांना विमानप्रवासची तिकिटं देण्यात येणार आहेत.) पण बाकीच्या जनतेनं निषेध केला आहे. (यांना तिकिटं मिळणार नाहीत.) जनतेच्या मते हा तत्त्वाचा प्रश्‍न आहे, परदेशावारीचा नाही! त्यांचं असं म्हणणं आहे, की त्या सत्तर लोकांनी विमानासाठी आपलं इमान विकू नये! जनता चिडलेली आहे आणि प्रकरण चिघळलं आहे. म्हणून आम्ही आमच्या सुबक सेक्रेटरींना सांगून घारपुरे यांना फोन लावला.


""काय घारपुरे का? ओळखलं का आम्हाला?'' आमची वादळापूर्वीची शांतता.
""माफ करा हं. नाही ओळखलं.'' भल्या पहाटे उठविल्यामुळे झोपाळलेल्या आवाजात घारपुरेंची दिलगिरी. गाफील क्षणी पकडायचा आमचा कावा यशस्वी.
""बास का राव! एवढ्यात विसरला का आम्हाला? आम्ही पोपटराव - पोलिटिकल एजंट!''
""आँ? हो! हो!! पोपटराव? असं, असं! काय म्हणता?'' घारपुरेंचा गोंधळ.
""अहो घारपुरे - काय चालवलंय तुम्ही लोकांनी? आँ? खिशात पैसे खुळखुळायला लागले म्हणून माज आला काय तुम्हाला? साहित्य संमेलन म्हणजे काय घरचं हळदीकुंकू वाटलं तुम्हाला?'' आमचा झंझावात.
""काय बोलताय काय? आमच्या मंडळाचा पाठिंबा आहे. घरचं कार्य नव्हे.'' हडबडून, गडबडून गेलेले घारपुरे.



""आम्हाला भोट समजता काय? मराठी माणूस म्हटला म्हणजे दुफळी वगैरे असायचीच. कॅलिफोर्नियात आर्टस असोसिएशनच्या मुकुंदपंत मराठेंना विचारा. त्यांना वाटतं, अमेरिकेतलं साहित्य संमेलन हा केवळ एक मनोरंजनाचा खेळ होईल. त्यापेक्षा तुम्ही असं करा. पुढच्या वर्षी तुमचं बीएमएम संमेलन आहे ना - ते फिलाडेल्फियाला न भरवता फलटणला भरवा.''
""काय? अहो ते कसं शक्‍य आहे? त्याला काही अर्थ आहे का?''
""का हो, आता कसं वाटतं? आमचं संमेलन तुम्ही घेतल्यावर आम्हाला कसं वाटेल याची काही चिंता केली होती तुम्ही? अहो तुमची खेळी आम्हाला चांगली समजते. हा तुमच्या पार्टीचा "पॉवर प्ले' आहे, बाकी काही नाही! तुम्हाला हे दाखवून द्यायचंय, की साहित्य संमेलन अमेरिकेत भरवून दाखवतो की नाही ते बघा! कळतं आम्हाला.''आमचा घणाघात.
""नाही हो, तसं नाही. आम्हाला खरंच वाटतं...'' घारपुरे अजून चाचपडत होते.
""घारपुरे, आम्ही राजकारणाचा धंदा करतो. आम्ही प्रोफेशनल आहोत. तुम्ही नवशिके आहात. राजकारणाच्या खेळी सावधपणे, घाई न करता कराव्यात. अति घाई, संकटात नेई! आपल्या राज्य सरकारची सूचना आहे. आधी जनमानसाचा अंदाज घ्यावा लागतो. साधकबाधक चर्चा घडवावी लागते. आमच्यासारख्या एजंटांना सल्ला विचारावा लागतो.'' शेवटी आमची धंद्याची बात करायला तर हवीच!



""पोपटराव, आमचं काय चुकलं? संमेलनाच्या परंपरेची आब राखणारं आयोजन आम्ही करू.'' घारपुरेंना जरा धीर वाटायला लागला होता.
""ते सगळं खरं हो! तुम्ही खूप कराल; पण महाराष्ट्रातल्या जनतेचं काय? दिवसाढवळ्या दरोडा टाकल्यासारखं तुम्ही संमेलन हिसकावून घेतलंत. मूठभर धनाढ्य लोकांनी उरूस भरवावा आणि आमच्या साहित्यिकांनी त्यात भाग घ्यावा ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही आमच्या आयुष्यात एकही पुस्तक विकत घेऊन वाचलं नाही म्हणून काय झालं; पण आमच्या लेखकांची आणि आमची चार दिवस ताटातूट होणार म्हणून काही मराठी जनांचे, विशेषतः प्रकाशकांचे डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत. श्रीकृष्ण गोकुळ सोडून निघाला तेव्हा गोपाळांनी असाच टाहो फोडला होता. साहित्यिक परदेशी जाणार या विचारानंच आम्हाला विरहाईचा दाह होऊ लागला आहे. एरवी साहित्यिक जिवंत आहे की मेला आहे याची आम्ही दखल घेऊ किंवा घेणार नाही. आचार्य अत्रे यांचा "विनोद चिंतामणी' हा लेख आठवतो ना? "विनोदसम्राट चिं. वि. जोशी गेले तेव्हा रात्री साडेबारा वाजता आम्ही स्मशानात हार घेऊन गेलो. तेथे चिंतामणरावांचा देह चितेवर एकटाच शांतपणे जळत होता. ज्वाला अशा काही दिमाखात भडकत होत्या म्हणता ! आजूबाजूला कोणीही नव्हते आणि पलीकडच्या धर्मशाळेच्या पायरीवर बसून आम्ही एकटेच रडत होतो.'



...पण, आमचे लेखक परदेशी जाणार या कल्पनेनं आम्हाला प्रेमाचा पान्हा फुटलेला आहे. वयोवृद्ध पु. लं.बद्दल "हा पूल आता मोडकळीस आला आहे' अशी आचरट विधानं करणाऱ्या लोकांना आम्ही निवडून देऊ; पण आमच्या साहित्यिकांना देशाबाहेर जाऊ देणार नाही. आमच्या मुलाबाळांना क्षणाचाही विचार न करता आम्ही तत्परतेनं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करू; पण "म्हराटी' या इंडियन लॅंग्वेजमध्ये लिटरचेअर राईट करणारे आमचे लेखक आम्हाला सोडून जातील, तर आमच्या स्वाभिमानाला सहस्र इंगळ्या डसतील. म्हणून घारपुरे आमचा प्रश्‍न असा आहे, की तुम्हाला कशासाठी बोंबलायला साहित्य संमेलन अमेरिकेत भरवावंसं वाटतं? आमचा नेमका सवाल.
""पोपटराव तुम्हाला साहित्य आणि साहित्यिकांबद्दल जसं प्रेम, आस्था, आदर, अभिमान वाटतो तसाच आम्हालाही वाटतो. तुम्ही सकाळच्या चहाबरोबर "सकाळ' वाचत असाल, तर आम्हीसुद्धा ऑफिसमधल्या सकाळच्या कॉफीबरोबर इ-सकाळ वाचीत असतो. तुम्ही वालावलकरांची "बाकी शून्य' कादंबरी चवीनं वाचत असाल, तर आम्ही अजूनही बटाट्याच्या चाळीचे जिने असंख्य वेळा चढत-उतरत असतो. तुम्ही...''

""थांबा घारपुरे! तुम्ही फारच छान आठवण करून दिलीत. "बाकी शून्य'मधल्या त्या फिकट गुलाबी साडीतल्या बाईंचा अड्रेस विचारून घ्यायला हवा. नाशिक साइडला गेलो की भेटून घेऊ बाईंना. सेक्रेटरी हे एवढं टिपून ठेवा. बरं तुमच्या भावना पोचल्या घारपुरे. अहो, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, रमेश मंत्री, व. पु. काळे वगैरे लेखक आता जुने झाले. नव्या साहित्याच्या वाटा तुम्हाला कशा कळणार? नवे विषय, नवे साचे, नव्या संवेदना, नव्या जाणिवा, नवी क्षितिजं, नवे प्रश्‍न यांची कल्पना तुम्हाला कशी येणार? "निबंध लेखनाचे साहित्यातील स्थान व योगदान' अशा परिसंवादात तुम्हाला काय रस असणार? कशाला नको त्यात नाक खुपसताय? आँ? तुम्ही पलं विज्ञान आणि तंत्रज्ञान करताय तेच करीत बसा. साहित्यातलं काय कळतंय तुम्हाला घारपुरे?'' आमचं कळकळीचं सांगणं.



""आता लक्षात आला तुमचा एकूण रोख काय आहे तो,'' घारपुरेंच्या कडक आवाजावरून ते आता चांगलेच सावरल्यासारखे वाटू लागले होते. ""तिथल्या काही कलाकारांना, नकलाकारांना, गायक-वादकांना, साहित्यिकांना आणि कदाचित आम जनतेलासुद्धा असं वाटायची शक्‍यता आहे, की अमेरिकन मराठी लोक एकजात गाढव आहेत. त्यांना साहित्य-संगीत-कलेतलं काय कळतंय? एका ठिकाणी पुण्याहून आलेल्या एका तरुण गाणाऱ्या बाई कनवटीला १६०० डॉलरचा चेक खोचत म्हणाल्या, ""शी! काय गावंढळ गाव आहे! संगीतातलं काही कळत नाही या लोकांना! आता भारतात गेले की सांगते सगळ्यांना, "घरी हरी हरी करत बसा; पण इथं येऊ नका. म्हणजे आपले लाड, कोडकौतुक झालं आणि वर भरभक्कम बिदागी मिळाली तशी दुसऱ्या कुणाला मिळू नये ही बाईंची सदिच्छा. पोपटराव, आम्ही तरी कुठं असा दावा करतो की आम्हाला कळतं? पण तुम्ही एक प्रयोग करा. तुमच्या सेक्रेटरीला विद्येच्या माहेरघरात म्हणजे पुण्यात लकडी पुलाच्या एका टोकाला उभं करा. रांगेनं शंभर लोकांना विचारा, की गेल्या पाच वर्षांत प्रसिद्ध झालेली दहा पुस्तकं आणि पाच नव्या लेखकांची नावं सांगा. दहा टक्के लोक जरी या परीक्षेत पास झाले तरी आम्ही आमचा प्रस्ताव मागं घेऊ.'' घारपुरेंचा प्रतिहल्ला.



""घारपुरे! हे फारच होतंय! आमची ही परीक्षा करताय तुम्ही? अहो इथल्या आयुष्याचा वेग किती वाढलाय याची कल्पना आहे का तुम्हाला? त्यातून हे नवे लेखक! हॅट स्साला! हल्ली पूर्वीसारखं क्वालिटी लिटरेचअर कोण लिहितो? कोणाला टाइम नाही भंकस वाचायला. नट-नट्यांच्या जीवनातले चढ-उतार हा श्‍लेष आहे घारपुरे. हा हा! ते मात्र आम्ही चवीनं वाचतो; पण म्हणून काय झालं? रसिकांची आणि लेखकांची अशी ताटातूट करण्याचं पाप आपण आपल्या माथी घेऊ नये. बोलण्यावरून तसे भले गृहस्थ वाटता म्हणून हा सल्ला देतोय. अहो, कशासाठी हा आग्रह करताय? कष्टाने कमावलेले पैसे का उधळताय?'' आम्ही मर्मावर बोट ठेवलं.



""त्या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हीच दिलंय पोपटराव. आम्ही गाढव आहोत म्हणून! काय आहे, मराठी भाषेचं गाढवावर फार प्रेम आहे. त्यामुळे लाथा देणं आणि लाथा खाणं याची आम्हाला सवय आहे. महाराष्ट्रापासून इतक्‍या दूर राहिलो तरी आम्ही घरी मराठीत बोलतो आणि कार्यक्रम बसवतो, मराठी कलावंतांना बोलावतो, मराठी चित्रपट पाहतो, मुलांना मराठी शिकवतो. सामानात कितीही जागा नसली तरी चार मराठी पुस्तकं भरतो. कामावर जाता-येताना मराठी गाणी ऐकतो. सगळाच गाढवपणा. त्यातून मराठी साहित्यिकांनी आम्हाला जो आनंद दिला, आमचं भावविश्‍व संपन्न केलं त्याचं थोडंफार तरी ऋण फेडता यावं, त्यांचे विचार प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकायला मिळावेत, त्यांच्या संगतीत आयुष्यातले चार क्षण उजळून जावेत असंही गाढवपणाचे विचार आमच्या मनात डोकावत राहतात. त्यामुळे इतका गाढवपणा केलाच आहे तर अजून थोडा करू या. आपण टू वे ऑडिओ व्हिडीओ कॉन्फरंसिंगची सोय करू. म्हणजे इथं काय चाललंय ते तिथं तुम्हाला गाढवासारखं लोळतं पाहायला मिळेल. काय? म्हणजे तुम्हीही खूष, आम्हीही खूष. कविवर्य म्हणाले, की साहित्य संमेलन दक्षिण ध्रुवावर करा. सध्या कॅलिफोर्निया या पश्‍चिम ध्रुवावरून सुरवात करू म्हणजे त्या कविमनाला थोडी शांती लाभेल.'' घारपुरे त्यांचा हट्ट चालूच ठेवतात.



""घारपुरे, पश्‍चिम ध्रुव? हा काय गाढवपणा आहे? माझं ऐका जरा सबुरीनं घ्या. तुम्ही अमेरिकन लॉबी तयार करा. आम्हीही इथं जनमत तयार करायची खटपट करतो.'' आमचा सल्ला.
""छे! छे! सबुरी वगैरे काही नाही! साहित्य संमेलन कॅलिफोर्नियात होणारच! कॅलिफोर्निया हे अमेरिकेचं कोकण आहे! ताटात काय आणि वाटीत काय! मराठी साहित्याचे झेंडे सातासमुदारापार फडकले पाहिजेत. बोला पोपटराव - तथास्तु म्हणा!'' घारपुरेंचा निर्धार.
""बरं मग, तुमचा एवढा निग्रहच असला तर बघू, खटपट करतो. दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल पुढं टाकून उद्दिष्ट साधता येईल, तर असो.

आपल्याशी बोलून बरं वाटलं. गरज पडेल तेव्हा पोपटराव एजंटाला फोन करा. आम्ही सेवेला हजर आहोत आणि हो, तेवढं सन्मान्य निमंत्रितांच्या यादीत आमचं नाव घाला. बाकी आमची अपेक्षा काही नाही!


तथास्तु!


जय महाराष्ट्र! जय हिंद!''


डॉ. प्रियदर्शन मनोहर