अमेरिकेला येऊन महिना झाला. धाकटया लेकाच्या व सूनबाईच्या संसार वेलीवर पहिल्या वहिल्या गोजिरवाण्या कलिकेचं, सुहानाचं आगमन झालं. नातीच्या कौतुकात, तिचे लोभसवाणे अविर्भाव निरखण्यात दिवस कसे पाखरासारखे उडून जात होते. येवढंसं चिमणं लेकरू अवघ्या घरादाराला झुलवत होतं.नेमाने, श्री. नानांची खुशालीची, घराच्या देखरेखीसंबंधी व यवतमाळच्या इतर बातम्यांची मेल येत होती. श्री. नाना व सौ. वहिनी, म्हणायला आमचे शेजारी. पण कुटुंबातला जिव्हाळ्याचा, नातेसंबंधातला माणूस करणार नाही, एवढी आस्थेवाइक विचारपूस व अत्यंत मनापासून सर्वतोपरी मदत असायची त्यांची आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी सहजसुलभतेने. मदत घेणाऱ्यालाच संकोच वाटावा. एवढे करूनही पुन्हा आपण त्या गावचेच नाही, अशी निरलस वागणूक. त्यांच्याच भरवशावर आम्ही आमचे घर सोडून आलो होतो, असे म्हणणे वावगे ठरू नये.अचानक एक दिवस, त्यांची मेल आली, की तुमच्या घरी चोरी झालीये. उन्हाळ्याचे दिवस.
सगळ्यांकडे दुपारी, रात्रीही कुलर सुरू. दरवाजे बंद व उन्हामुळे सगळीकडे सामसूम. एरवीही चोऱ्यांचे प्रमाण वाढलेलेच. पण उन्हाळ्यात विशेष वाटते. शिवाय नाही म्हटले, तरी अमेरिकेला जाणार म्हणून अनेक दिवसांपासून आमची जाहिरातही लागलेली होतीच. घर, खिडक्या सतत बंद, फाटकाला निरंतर कुलूप व सर्वत्र सामसूम म्हटल्यावर चोरांचे आयतेच फावणार. लग्न, समारंभानिमित्त चार-आठ दिवसही लोक घर बंद करून जायला घाबरतात. आम्ही तर सहा महिने मुक्कामाला आलो आहोत.आपले घर सुरक्षित राहावे, अशी कितीही मनापासूनची इच्छा असली, तरी "मन चिंती ते वैरी न चिंती' म्हणतात, तशी मनात धाकधूक होतीच. त्यामुळे ही बातमीही तशी अनपेक्षित आणि म्हणून तितकीशी धक्कादायक नव्हती, असे मनाचे समाधान करून घेतले.
अमेरिकेला जाताना घरी जास्त जोखमीचे व किमती सामान ठेवायचे नाही म्हणून शक्यतेवढी सर्व काळजी घेतली होतीच. महत्त्वाचे पेपर्स, टी.व्ही., कॉम्प्युटरसारख्या वस्तू, चांदीची भांडी व दागिने इ. घरात काही नव्हतेच. हे सगळे खरे असले, तरी बायकांचे मन ते. एवढासा चमचा किंवा रोज वापरातली वाटी दिसली नाही, तर शोध लागल्याशिवाय गप्प बसणारा नाही स्त्री स्वभाव. मीही अपवाद नव्हतेच. क्षणात असंख्य विचार मनात डोकावून गेलेत. संसाराला सुरवात केल्यापासूनचा चाळीस, बेचाळीस वर्षांचा काळ एखाद्या चित्रपटासारखा मनश्चक्षूंपुढून सरकला. मनाच्या टिपकागदाने टिपलेल्या असंख्य कडू, गोड स्मृतींनी मनात फेर धरला.सहज खिडकीशी आले. समोर मेपलच्या झाडावर गेल्या काही दिवसांपासून एका पक्षाचे घरटे बांधणे सुरू होते. पिलांचा आज आवाज येत नव्हता. मनात आले, काडी काडी करून मेहनतीने चिमणी (त्या पक्षाचे नाव माहीत नसल्याने मी चिमणीच म्हणत असे) घरटे बांधते. पण पिलांचे संगोपन झाले, पिलांनी घरट्याबाहेर पंख पसरले, की निर्विकारपणे ती घरट्याचा निरोप घेते. एवढ्याशा चिमण्या पाखरांचेसुद्धा मन किती मोठे. निर्मोही.आपण मात्र एवढी वर्षे संसार केला. वयाची बासष्ट वर्षे सगळ्या हौशी, मौजी झाल्यात; तरीही लोभ सुटत नसावा ना? मुले कर्ती झालेली आहेत. सुविद्य, कर्तबगार सुना आहेत. सगळे आपापल्या संसारात रमले आहेत. नाव, पैसा, गाड्या सगळे वैभव आहे. कुशाग्र बुद्धीचा नातू व चिमुकली नात आहे. आमचे उभयतांचे आजवरचे आयुष्य आनंदात व वैभवात गेले आहे. कसलीही चिंता नाही.
घरी चोरी झाली, एवढीच बातमी कळली होती. भामटयांनी कशा, कशावर हात मारला, हे अद्याप कळलेच नाहीये. माझं मन कधीच यवतमाळला पोहोचलं. चोरीला काय काय गेलं असेल? खूप गोड असली, तरी ह्यांच्या औषधांच्या कपाटातली औषधं चोरांना आवडणार नाहीतच. त्यामुळे ती सेफ आहेत. पेट्या मागून पेट्या चोरांनी खूप अपेक्षेने उघडल्या तरी त्यातून सगळी जाडजूड पुस्तके बघूनच ते चक्रावतील. त्यात त्यांना इंटरेस्ट वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याजवळ पुस्तके वाचण्याइतका वेळही कुठे असणार? उरला प्रश्न भांड्या-कुंड्यांचा. ती चोर महोदयांच्या कामी येऊ शकतील. विकताही येतील म्हणून कदाचित त्यांची संख्या बरीच रोडावेल. बरेच झाले की काम कमी होईल. भांडी घासणारी मोलकरीणही खूश.सगळ्या खोल्यांमधून मनाने भटकून आल्यावर मला खूप हलके हलके वाटू लागले. आपल्याला फारसे वाईट वाटले नसल्याचेही लक्षात आले. घरातला बराच पसारा कमी होणार आहे. आपल्या गरजाही सीमित होतील. नाहीतरी हल्ली आवरशक्तीही कमीच झाली होती. मेंटेनन्स तरी कुठे नीट होणार होता पुढे पुढे! हळू हळू शरीरासारखी मनालाही निवृत्तीची ओढ लागलीच आहे ना?
आटोपशीर संसार, इतर आवडीच्या कामाकरता थोडा जास्त वेळही देता येईल. अरेच्या, चोरीच्या निमित्ताने छानच संधी आली आहे की, पोथ्या- पुराण, कीर्तन, प्रवचन यांनी साधली नसती असी निर्मोही अवस्था. निवृत्तीचा सूर चोर महोदयांनी दाखवून दिला आहे. खरं तर आभारच मानायला हवेत या शविर्लकांचे.आले अलिप्ततेने स्वतःच्या घरट्याचा निरोप घेणारी चिमणी व दुसऱ्याच्या घरावर डाका घालूनही तत्त्वज्ञान शिकवणारा चोर, कोणाला गुरू मानायचे? कोणाचे योगदान मोठे? तुम्हाला ठाऊक आहे उत्तर? असल्यास जरूर कळवा.
- अनिता महाबळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
अनिता महाबळ excellent article.
Keep wririting.
pailteer blog sathi amache kahi lekh paThavayche asatil, tar te kase paThavavet?
Blogwar konihi kahihi chhote article taku shakato. tyamule BOLG war krupaya fakta mat pradarshan kara. Article taku naka.
Article dyayache asel tar te email ne pailteer@esakal.com la pathava.
आशालता वडजे,
तुम्ही पैलतीर ब्लाॅगसाठी जरूर लिखाण पाठवा...
चित्रा
Hello Anitaji! tumche likhan kharach khup chchan ahe . Khare tar te khup prabhavshali ahe. Tumche lihine khup varun-varun phar sadhe watate pan tyat neet dokavun pahile ki mag tyatla khare ulagadate. Mazyakadun tumhala "BEST OF LUCK" Tumche likhan ashech amhala wachayla miludyat hi "NAMRA VINANTI"
Post a Comment