Tuesday, August 26, 2008

घारपुरे, तुम्हाला काय कळतंय?

आपलं नाव पोपटराव.

आपलं म्हणजे माझं, तुमचं नव्हे. मी माझा उल्लेख आदरार्थी अनेकवचन वापरून केला यावरून तुम्हाला असं वाटेल, की आम्ही कोण्या बड्या राज(कारणी) घराण्यात जन्मलो आहोत; पण तसं काही नाही. आम्ही आमच्या हिमतीवर मोठे झालो आहोत. आम्ही आमदार नाही; पण आमदार निवास रूम नं. १७५६ मध्ये गेली पंधरा-सोळा वर्षं राहतो. आमदार, खासदार आणि मंत्रालयाशी संधान बाळगून आहोत त्यामुळे आम्हाला थोडी पावर प्राप्त झाली आहे.



उभ्या महाराष्ट्रातलं कोणतंही काम आम्हाला सांगा, कमिशन काढा की काम फत्ते! आम्ही म्हणजे प्रत्येक अडचणीवर मात करणारा उड्डाणपूलच आहोत. तुम्ही आम्हाला ओळखलं असेलच. या पोपटराव एजंटाच्या जीवनावर पुरुषोत्तम बोरकरांनी कादंबरी लिहिलेली आहे. तेवढाच आमचा आणि वाङ्‌मयाचा संबंध! बाकी वाचन वगैरे करून आपण सालं असं लाइफ बरबाद करीत नसतो. कोण कुणाला लागू झाला हे सांगायला दोनदोनशे पानं काय खरडतात हे लोक कुणास ठाऊक? आमचं म्हणजे एकीकडे अरबी समुद्र - दुसरीकडे चरबी समुद्र. आपण डायरेक्‍ट ऍक्‍शनवाले. आपल्याकडे फालतू घालवायला टाइम नाही. मेसमध्ये स्वयंपाक करते तो पक्षी आपण हेरला- सरळ जाऊन भिडलो. बास्स. दोन दिवसांत काम फत्ते आणि हे आपले कविता करताहेत. हॅट साला! "मराठी लेखकांचं अनुभवविश्‍व फारच तोकडं आहे,' असं कोणी म्हणाला तर त्यात काही वावगं आहे, असं मी म्हणणार नाही याची शक्‍यता नाकारता येणार नाही. काय? कळलं की नाही?



आम्ही राजकारणी एजंट- पुढाऱ्यांकडून शिकणार - म्हणजे असंच कोड्यात बोलणार आणि पब्लिक टाळ्या वाजवणार. ठरलेलंच समीकरण आहे ते. आमच्या बोलण्यात आणि वाङ्‌मयात एक प्रकारचं साम्य आहे. बऱ्याच वेळा दोन-चारशे पानं मजकूर वाचूनसुद्धा लेखकाला नक्की काय म्हणायचं आहे याचा पत्ता वाचकाला लागत नाही. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांचा संबंध जवळचा आहे. पब्लिकला गोंधळात टाकणं व नंतर आपल्याला हवी ती वाट दाखवणं (किंवा वाट लावणं) हे समान सूत्र आहे; पण दुर्दैवानं सध्या मात्र वातावरण गढूळ झालं आहे आणि दोहोतलं सख्य कमी व्हायला लागलं आहे. तर या प्रकरणाचा तपास लावायचं काम आमच्या आमदारांकडे, पर्यायानं आमच्या गळ्यात येऊन पडलं आहे.



भानगड अशी आहे, की कॅलिफोर्नियात राहणारे श्री. घारपुरे आणि त्यांचे काही मित्र यांच्या डोक्‍यात खूळ भरलं, की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकत भरवायचं ! झालं, त्यांनी एक प्रस्ताव तयार केला आणि अ. भा. मराठी साहित्य महामंडळाकडे पाठवून दिला. मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी हा प्रस्ताव प्रचंड बहुमतानं मान्य झाल्याचं जाहीर केलं. काही लोकांनी हे "ठाले-पाटील' कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला. काही लोकांनी ठाले-पाटील की ढाले-पाटील याची चौकशी केली. पूज्य बाळासाहेबांनी आपण "असल्या' (म्हणजे "साहित्य') संमेलनांना जात नसतो, असं जाहीर केलं.



ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांनी "दक्षिण ध्रुवावर संमेलन घ्या' असा प्रस्ताव मांडला. लेखक आणि प्रकाशक यांनी अमेरिकेतलं साहित्य संमेलन म्हणजे कंपूबाज लेखकांची पिकनिक आहे, हा फार्स आहे, हा कृतघ्नपणा आहे, अशा तऱ्हेची टीकेची झोड उठवली. मधू मंगेश कर्णिक यांनी "इंद्राय स्वाहाः तक्षकाय स्वाहाः' या न्यायाने महामंडळच बरखास्त करून नवीन संघटना निर्माण करावी, रत्नागिरीला समांतर साहित्य संमेलन भरवावं, अशा सूचना केल्या. एकूण पाहता जनतेत प्रक्षोभ उसळला आहे. नाही म्हणायला सुमारे सत्तर लोकांनी महामंडळाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. (यांना विमानप्रवासची तिकिटं देण्यात येणार आहेत.) पण बाकीच्या जनतेनं निषेध केला आहे. (यांना तिकिटं मिळणार नाहीत.) जनतेच्या मते हा तत्त्वाचा प्रश्‍न आहे, परदेशावारीचा नाही! त्यांचं असं म्हणणं आहे, की त्या सत्तर लोकांनी विमानासाठी आपलं इमान विकू नये! जनता चिडलेली आहे आणि प्रकरण चिघळलं आहे. म्हणून आम्ही आमच्या सुबक सेक्रेटरींना सांगून घारपुरे यांना फोन लावला.


""काय घारपुरे का? ओळखलं का आम्हाला?'' आमची वादळापूर्वीची शांतता.
""माफ करा हं. नाही ओळखलं.'' भल्या पहाटे उठविल्यामुळे झोपाळलेल्या आवाजात घारपुरेंची दिलगिरी. गाफील क्षणी पकडायचा आमचा कावा यशस्वी.
""बास का राव! एवढ्यात विसरला का आम्हाला? आम्ही पोपटराव - पोलिटिकल एजंट!''
""आँ? हो! हो!! पोपटराव? असं, असं! काय म्हणता?'' घारपुरेंचा गोंधळ.
""अहो घारपुरे - काय चालवलंय तुम्ही लोकांनी? आँ? खिशात पैसे खुळखुळायला लागले म्हणून माज आला काय तुम्हाला? साहित्य संमेलन म्हणजे काय घरचं हळदीकुंकू वाटलं तुम्हाला?'' आमचा झंझावात.
""काय बोलताय काय? आमच्या मंडळाचा पाठिंबा आहे. घरचं कार्य नव्हे.'' हडबडून, गडबडून गेलेले घारपुरे.



""आम्हाला भोट समजता काय? मराठी माणूस म्हटला म्हणजे दुफळी वगैरे असायचीच. कॅलिफोर्नियात आर्टस असोसिएशनच्या मुकुंदपंत मराठेंना विचारा. त्यांना वाटतं, अमेरिकेतलं साहित्य संमेलन हा केवळ एक मनोरंजनाचा खेळ होईल. त्यापेक्षा तुम्ही असं करा. पुढच्या वर्षी तुमचं बीएमएम संमेलन आहे ना - ते फिलाडेल्फियाला न भरवता फलटणला भरवा.''
""काय? अहो ते कसं शक्‍य आहे? त्याला काही अर्थ आहे का?''
""का हो, आता कसं वाटतं? आमचं संमेलन तुम्ही घेतल्यावर आम्हाला कसं वाटेल याची काही चिंता केली होती तुम्ही? अहो तुमची खेळी आम्हाला चांगली समजते. हा तुमच्या पार्टीचा "पॉवर प्ले' आहे, बाकी काही नाही! तुम्हाला हे दाखवून द्यायचंय, की साहित्य संमेलन अमेरिकेत भरवून दाखवतो की नाही ते बघा! कळतं आम्हाला.''आमचा घणाघात.
""नाही हो, तसं नाही. आम्हाला खरंच वाटतं...'' घारपुरे अजून चाचपडत होते.
""घारपुरे, आम्ही राजकारणाचा धंदा करतो. आम्ही प्रोफेशनल आहोत. तुम्ही नवशिके आहात. राजकारणाच्या खेळी सावधपणे, घाई न करता कराव्यात. अति घाई, संकटात नेई! आपल्या राज्य सरकारची सूचना आहे. आधी जनमानसाचा अंदाज घ्यावा लागतो. साधकबाधक चर्चा घडवावी लागते. आमच्यासारख्या एजंटांना सल्ला विचारावा लागतो.'' शेवटी आमची धंद्याची बात करायला तर हवीच!



""पोपटराव, आमचं काय चुकलं? संमेलनाच्या परंपरेची आब राखणारं आयोजन आम्ही करू.'' घारपुरेंना जरा धीर वाटायला लागला होता.
""ते सगळं खरं हो! तुम्ही खूप कराल; पण महाराष्ट्रातल्या जनतेचं काय? दिवसाढवळ्या दरोडा टाकल्यासारखं तुम्ही संमेलन हिसकावून घेतलंत. मूठभर धनाढ्य लोकांनी उरूस भरवावा आणि आमच्या साहित्यिकांनी त्यात भाग घ्यावा ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही आमच्या आयुष्यात एकही पुस्तक विकत घेऊन वाचलं नाही म्हणून काय झालं; पण आमच्या लेखकांची आणि आमची चार दिवस ताटातूट होणार म्हणून काही मराठी जनांचे, विशेषतः प्रकाशकांचे डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत. श्रीकृष्ण गोकुळ सोडून निघाला तेव्हा गोपाळांनी असाच टाहो फोडला होता. साहित्यिक परदेशी जाणार या विचारानंच आम्हाला विरहाईचा दाह होऊ लागला आहे. एरवी साहित्यिक जिवंत आहे की मेला आहे याची आम्ही दखल घेऊ किंवा घेणार नाही. आचार्य अत्रे यांचा "विनोद चिंतामणी' हा लेख आठवतो ना? "विनोदसम्राट चिं. वि. जोशी गेले तेव्हा रात्री साडेबारा वाजता आम्ही स्मशानात हार घेऊन गेलो. तेथे चिंतामणरावांचा देह चितेवर एकटाच शांतपणे जळत होता. ज्वाला अशा काही दिमाखात भडकत होत्या म्हणता ! आजूबाजूला कोणीही नव्हते आणि पलीकडच्या धर्मशाळेच्या पायरीवर बसून आम्ही एकटेच रडत होतो.'



...पण, आमचे लेखक परदेशी जाणार या कल्पनेनं आम्हाला प्रेमाचा पान्हा फुटलेला आहे. वयोवृद्ध पु. लं.बद्दल "हा पूल आता मोडकळीस आला आहे' अशी आचरट विधानं करणाऱ्या लोकांना आम्ही निवडून देऊ; पण आमच्या साहित्यिकांना देशाबाहेर जाऊ देणार नाही. आमच्या मुलाबाळांना क्षणाचाही विचार न करता आम्ही तत्परतेनं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करू; पण "म्हराटी' या इंडियन लॅंग्वेजमध्ये लिटरचेअर राईट करणारे आमचे लेखक आम्हाला सोडून जातील, तर आमच्या स्वाभिमानाला सहस्र इंगळ्या डसतील. म्हणून घारपुरे आमचा प्रश्‍न असा आहे, की तुम्हाला कशासाठी बोंबलायला साहित्य संमेलन अमेरिकेत भरवावंसं वाटतं? आमचा नेमका सवाल.
""पोपटराव तुम्हाला साहित्य आणि साहित्यिकांबद्दल जसं प्रेम, आस्था, आदर, अभिमान वाटतो तसाच आम्हालाही वाटतो. तुम्ही सकाळच्या चहाबरोबर "सकाळ' वाचत असाल, तर आम्हीसुद्धा ऑफिसमधल्या सकाळच्या कॉफीबरोबर इ-सकाळ वाचीत असतो. तुम्ही वालावलकरांची "बाकी शून्य' कादंबरी चवीनं वाचत असाल, तर आम्ही अजूनही बटाट्याच्या चाळीचे जिने असंख्य वेळा चढत-उतरत असतो. तुम्ही...''

""थांबा घारपुरे! तुम्ही फारच छान आठवण करून दिलीत. "बाकी शून्य'मधल्या त्या फिकट गुलाबी साडीतल्या बाईंचा अड्रेस विचारून घ्यायला हवा. नाशिक साइडला गेलो की भेटून घेऊ बाईंना. सेक्रेटरी हे एवढं टिपून ठेवा. बरं तुमच्या भावना पोचल्या घारपुरे. अहो, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, रमेश मंत्री, व. पु. काळे वगैरे लेखक आता जुने झाले. नव्या साहित्याच्या वाटा तुम्हाला कशा कळणार? नवे विषय, नवे साचे, नव्या संवेदना, नव्या जाणिवा, नवी क्षितिजं, नवे प्रश्‍न यांची कल्पना तुम्हाला कशी येणार? "निबंध लेखनाचे साहित्यातील स्थान व योगदान' अशा परिसंवादात तुम्हाला काय रस असणार? कशाला नको त्यात नाक खुपसताय? आँ? तुम्ही पलं विज्ञान आणि तंत्रज्ञान करताय तेच करीत बसा. साहित्यातलं काय कळतंय तुम्हाला घारपुरे?'' आमचं कळकळीचं सांगणं.



""आता लक्षात आला तुमचा एकूण रोख काय आहे तो,'' घारपुरेंच्या कडक आवाजावरून ते आता चांगलेच सावरल्यासारखे वाटू लागले होते. ""तिथल्या काही कलाकारांना, नकलाकारांना, गायक-वादकांना, साहित्यिकांना आणि कदाचित आम जनतेलासुद्धा असं वाटायची शक्‍यता आहे, की अमेरिकन मराठी लोक एकजात गाढव आहेत. त्यांना साहित्य-संगीत-कलेतलं काय कळतंय? एका ठिकाणी पुण्याहून आलेल्या एका तरुण गाणाऱ्या बाई कनवटीला १६०० डॉलरचा चेक खोचत म्हणाल्या, ""शी! काय गावंढळ गाव आहे! संगीतातलं काही कळत नाही या लोकांना! आता भारतात गेले की सांगते सगळ्यांना, "घरी हरी हरी करत बसा; पण इथं येऊ नका. म्हणजे आपले लाड, कोडकौतुक झालं आणि वर भरभक्कम बिदागी मिळाली तशी दुसऱ्या कुणाला मिळू नये ही बाईंची सदिच्छा. पोपटराव, आम्ही तरी कुठं असा दावा करतो की आम्हाला कळतं? पण तुम्ही एक प्रयोग करा. तुमच्या सेक्रेटरीला विद्येच्या माहेरघरात म्हणजे पुण्यात लकडी पुलाच्या एका टोकाला उभं करा. रांगेनं शंभर लोकांना विचारा, की गेल्या पाच वर्षांत प्रसिद्ध झालेली दहा पुस्तकं आणि पाच नव्या लेखकांची नावं सांगा. दहा टक्के लोक जरी या परीक्षेत पास झाले तरी आम्ही आमचा प्रस्ताव मागं घेऊ.'' घारपुरेंचा प्रतिहल्ला.



""घारपुरे! हे फारच होतंय! आमची ही परीक्षा करताय तुम्ही? अहो इथल्या आयुष्याचा वेग किती वाढलाय याची कल्पना आहे का तुम्हाला? त्यातून हे नवे लेखक! हॅट स्साला! हल्ली पूर्वीसारखं क्वालिटी लिटरेचअर कोण लिहितो? कोणाला टाइम नाही भंकस वाचायला. नट-नट्यांच्या जीवनातले चढ-उतार हा श्‍लेष आहे घारपुरे. हा हा! ते मात्र आम्ही चवीनं वाचतो; पण म्हणून काय झालं? रसिकांची आणि लेखकांची अशी ताटातूट करण्याचं पाप आपण आपल्या माथी घेऊ नये. बोलण्यावरून तसे भले गृहस्थ वाटता म्हणून हा सल्ला देतोय. अहो, कशासाठी हा आग्रह करताय? कष्टाने कमावलेले पैसे का उधळताय?'' आम्ही मर्मावर बोट ठेवलं.



""त्या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हीच दिलंय पोपटराव. आम्ही गाढव आहोत म्हणून! काय आहे, मराठी भाषेचं गाढवावर फार प्रेम आहे. त्यामुळे लाथा देणं आणि लाथा खाणं याची आम्हाला सवय आहे. महाराष्ट्रापासून इतक्‍या दूर राहिलो तरी आम्ही घरी मराठीत बोलतो आणि कार्यक्रम बसवतो, मराठी कलावंतांना बोलावतो, मराठी चित्रपट पाहतो, मुलांना मराठी शिकवतो. सामानात कितीही जागा नसली तरी चार मराठी पुस्तकं भरतो. कामावर जाता-येताना मराठी गाणी ऐकतो. सगळाच गाढवपणा. त्यातून मराठी साहित्यिकांनी आम्हाला जो आनंद दिला, आमचं भावविश्‍व संपन्न केलं त्याचं थोडंफार तरी ऋण फेडता यावं, त्यांचे विचार प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकायला मिळावेत, त्यांच्या संगतीत आयुष्यातले चार क्षण उजळून जावेत असंही गाढवपणाचे विचार आमच्या मनात डोकावत राहतात. त्यामुळे इतका गाढवपणा केलाच आहे तर अजून थोडा करू या. आपण टू वे ऑडिओ व्हिडीओ कॉन्फरंसिंगची सोय करू. म्हणजे इथं काय चाललंय ते तिथं तुम्हाला गाढवासारखं लोळतं पाहायला मिळेल. काय? म्हणजे तुम्हीही खूष, आम्हीही खूष. कविवर्य म्हणाले, की साहित्य संमेलन दक्षिण ध्रुवावर करा. सध्या कॅलिफोर्निया या पश्‍चिम ध्रुवावरून सुरवात करू म्हणजे त्या कविमनाला थोडी शांती लाभेल.'' घारपुरे त्यांचा हट्ट चालूच ठेवतात.



""घारपुरे, पश्‍चिम ध्रुव? हा काय गाढवपणा आहे? माझं ऐका जरा सबुरीनं घ्या. तुम्ही अमेरिकन लॉबी तयार करा. आम्हीही इथं जनमत तयार करायची खटपट करतो.'' आमचा सल्ला.
""छे! छे! सबुरी वगैरे काही नाही! साहित्य संमेलन कॅलिफोर्नियात होणारच! कॅलिफोर्निया हे अमेरिकेचं कोकण आहे! ताटात काय आणि वाटीत काय! मराठी साहित्याचे झेंडे सातासमुदारापार फडकले पाहिजेत. बोला पोपटराव - तथास्तु म्हणा!'' घारपुरेंचा निर्धार.
""बरं मग, तुमचा एवढा निग्रहच असला तर बघू, खटपट करतो. दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल पुढं टाकून उद्दिष्ट साधता येईल, तर असो.

आपल्याशी बोलून बरं वाटलं. गरज पडेल तेव्हा पोपटराव एजंटाला फोन करा. आम्ही सेवेला हजर आहोत आणि हो, तेवढं सन्मान्य निमंत्रितांच्या यादीत आमचं नाव घाला. बाकी आमची अपेक्षा काही नाही!


तथास्तु!


जय महाराष्ट्र! जय हिंद!''


डॉ. प्रियदर्शन मनोहर

6 comments:

Life Chain Analysis said...

I read your articles and experience the real sence of life.It a great social work which teaches us much.
I also suggest to visit the site
www.infinitessaturn.com
this man is also doing unique work.
thanks lot again. regards
vinayak

Anonymous said...

simply fantastic!

Anonymous said...

Gharpure you are asking too much, Lakdi pulavar ubhe rahun Sahityachi charcha is too wayphal.
There are too many hot spots in Pune to discuss about Marathi Literature. See Popatrao in Private meeting and he will let you know.
Anand

Subodh Pathak said...

MLM business have this feature common in India. It seems the same is story in US also

Unknown said...

Gharpure I read your article. It's really a great thing. It's just a impressive to me !!!!!!!!!!!

Anonymous said...

पुरुषोत्तम बोरकर यांच्या 'आमदार निवास रुम नंबर १७५६' या कादंबरीतील हा उतारा आहे. आपण दुसऱ्या नावाने तो अशा रितीने प्रसिद्ध करणे याला वाङ्मयचौर्य असे म्हणतात.