Tuesday, September 2, 2008

ताव्हिये, परंपरा आणि आम्ही परदेशातले पालक

काही चित्रपट थोडा वेळ आपली करमणूक करतात,काही हसवतात,काही त्यातल्या गूढ घटनांनी विस्मित करतात,काही मनात विचारांची खळबळ उडवतात तर काहींमधलं नाट्य व सर्व रस इतके कलात्मकतेने चित्रित केलेले असतात की पुन्हा पुन्हा पहावं तर वेगळ काहीतरी लक्षात येतं. संवाद, अभिनय यातलं सूक्ष्म दिग्दर्शन नैपुण्य जाणवतं. असे चित्रपट मोजकेच! त्यापैकी आमचा खास आवडता म्हणजे ’Fiddler On The Roof'. हा तसा आता जुन्यापैकी पण अजूनहि बघितला की काहीतरी नवीन लक्षात येतं. याचं कथानक,गाणी अन् अभिनय सारंच अप्रतिम आहे.हा इथे Broadway show म्हणुनहि गाजला. आम्हा परदेशात रहाणारांना विशेष जिव्हाळ्याचा वाटावा असा हा चित्रपट. कारण यातल्या बऱ्याच छोट्या मोठ्या समस्या परक्या संस्कृतीत संसार करताना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात सोडवायची वेळ आलेली असते. काळ बदलला, समस्यांचे संदर्भ बदलले तरी त्यामागची भावना बदलत नाही आणि श्रद्धाना आव्हान करणारी समस्या उद्भवली तर मनात होणारे द्वंद्वहि तेवढेच क्लेशदायक... उरी जपलेले स्वप्न वाटचाल करायला जिद्द देत असते, पण अनेकदा संस्कार, मूल्ये कसाला लागतात. त्यावेळचे निर्णय आयुष्य व्यापणारे...सगळ्या कुटुंबाला दिशा देणारे...असंच काही या चित्रपटात जाणवतं आणि ताव्हियाच्या भूमिकेत इथल्या भारतीय पालकांचे प्रतिबिंब दिसते...

प्रथम या चित्रपटाविषयी -

झारच्या कारकिर्दीत रशियामध्ये रहाणाऱ्या ज्युइश लोकांच्या जीवनाचे फार सुंदर चित्रण त्यात केले आहे. त्यातली ताव्हियेची भूमिका मला फार आवडते. सुरुवातीलाच त्याचे जे स्वगत आहे, त्यात ख्रिस्चन लोकांच्या (आनातेव्हका) या गावात ही ज्यु कुटुंबे कशी सलोख्याने रहात असतात त्याचे वर्णन तो करतो. कुणी कुणाच्या अध्यात ना मध्यात. गरजेप्रमाणे एकमेकांचे गुण दोष डोळ्याआड करीत, एकमेकाना सांभाळून घेत सर्वांचे जीवन चालू. या छोट्या गावात रहाणे म्हणजे छपरावर उभं राहून फिडल वाजवताना तोल सांभाळणे अवघड, तसे. पण हा तोल कसा सांभाळतात? तर त्याचं उत्तर म्हणजे ’परंपरा’! सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत या परंपरा सांभाळीत सगळे व्यवहार,त्यांचा पेहराव, बोलणं, मुलांचं शिक्षण, त्यांची मध्यस्थातर्फे लग्ने जुळणं हे चालतं. परंपरांशिवाय जीवन अस्थिर होईल, परंपरा माणसाला स्वत:ची ओळख देतात अन् देव त्याच्याकडून काय अपेक्षितो ते शिकवतात अशी अढळ निष्ठा असलेला हा ताव्हिये पाच मुलींचा पिता पण देवावर श्रद्धा ठेवून आपला गरीबीचा संसार रेटत असतो. आपण श्रीमंत झालो तर मोठ्या हवेलीत बायकोला- गोल्डीला, ऐषआरामात ऐटीत वावरताना पाहू आणि लोक आपली मते आदराने ऐकतील अशी दिवास्वप्ने बघतो. पाचहि मुलीना चांगले नवरे मिळून त्या सुखात रहाव्या अशी दोघांची स्वाभाविक कळकळ. त्या काळात मध्यस्थातर्फेच लग्न जुळवण्याची पद्धत त्यामुळे अशा मध्यस्थाने सुचवलेल्या मुलाशी विशेषत: गरीब मुलीने न कुरकुरता लग्न करावे अशी अपेक्षा असे. अशा काळातहि प्रगतीसाठी उत्सुक असलेला ताव्हिये एका उमद्या शिक्षकाला मदत होईल अशी संधि दिसताच त्याला आपल्या मुलीना शिक्षण द्यायला आपल्या घरी ठेवून घेतो. दरम्यान एका वृद्ध महिलेच्या मध्यस्थीने तो मोठ्या मुलीचे लग्न एका वयस्क, श्रीमंत विधुर खाटकाशी ठरवतो. आपल्या मुलीला कशाची विवंचना रहाणार नाही हे समाधान त्याला ह्या संबंधात वाटते. त्या आनंदात असतानाच त्याच्याशी मित्रत्वाने वागणारा गावातला रशियन अधिकारी लवकरच काही निदर्शने होणार असल्याची सुचना त्याला देतो आणि बदलणाऱ्या वातावरणाची चाहूल लागते...

दुसऱ्या दिवशी गावातल्याच एका शिंप्याकडून जेंव्हा त्याचे या मुलीवर प्रेम असून ते दोघे वचनबद्धहि झाल्याचे कळते, मुलीला खाटकाशी लग्न अजिबात करायचे नाही हे लक्षात येते तेंव्हा तो त्याना लग्नाला अनुमति देतो, त्या दोघांचा आनंद पाहून सुखावतो आणि युक्तीने बायकोला खाटकाशी ठरलेला मुलीचा विवाहसंबंध चुकीचा असल्याचे पटवतो आणि मुलीचे लग्न त्या शिंप्याशी करून देतो. लग्न समारंभ साजरा होत असतानाच रशियन मिलिटरीचे लोक येऊन सारं उध्वस्त करतात. ताव्हियेबद्दल आदर असणारा तो रशियन अधिकारी त्याची माफी मागून आपला नाइलाज झाल्याचे सांगतो. ताव्हिये सुन्न, अवाक्, जणु गोठून जातो... या सुमारास राजकीय वातावरण तंग होऊ लागल्याच्या बातम्या येत असतात...
ताव्हियेची दुसरी मुलगी क्रांतिकारक विचाराच्या या शिक्षकाच्या प्रेमात पडते. तो त्या वेळी अन्यायी राजवटीला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर काम करण्यासाठी कियेव नावाच्या गावी जातो आणि काही दिवसानी या मुलीला पत्र पाठवून बोलावून घेतो.तिला लग्नाशिवाय असे दूर पाठवणे म्हणजे परंपरांनुसार प्रत्येक निर्णय घेणाऱ्या ताव्हियेला मोठच आव्हान.पण याहि वेळी मुलीवरचे त्याचे प्रेम त्याला हे धाडस करायला तयार करते आणि तो जड अंत:करणाने तिला निरोप देतो, तिकडे गेल्यावर आधी धार्मिक पद्धतीने लग्न करण्याचे आश्वासन ती देते आणि ’तिला सुखरुप ठेव, थंड प्रदेशात उबेत ठेव’म्हणून तो देवाची प्रार्थना करतो.
एव्हाना मोठ्या मुलीचे व तिच्या नवऱ्याचे चांगले बस्तान बसलेले असते, तिला मुलगा होतो, त्याने मागवलेल्या शिवणाच्या मशीनचे सर्वांकडून कौतुक होते कारण त्याचा व्यवसाय उत्तम चालल्याचे ते प्रमाणपत्र! या सुमारास तिसऱ्या मुलीचा एका ख्रिश्चन मुलीशी झालेला परिचय ताव्हियेला आवडत नाही आणि परत त्याची कसोटीची वेळ येते. ही मुलगी पळून जाऊन त्या मुलाशी लग्न करते, हा मुलगा चांगला असतो पण ताव्हियेला हे लग्न स्वीकारणे अशक्य वाटते. ती मुलगी जेंव्हा त्याची क्षमा मागायला येते तेंव्हा तो स्वत:शी म्हणतो, ’आजपर्यंत मी खूप तडजोड केली...पण या वेळी तडजोडीसाठी मी आणखी वाकलो तर मोडूनच जाईन...हे मला शक्य नाही, परंपरा फार मोलाच्या आहेत...’ त्याच्या या निश्चयात कुणी बदल करू शकत नाही. चित्रपटाच्या शेवटी सगळ्या ज्युइश लोकाना घरदार-गाव सोडूण जावे लागते त्या वेळी मात्र हळवार झालेला ताव्हिये ही मुलगी आणि जावई निरोप घ्यायला येतात तेंव्हा तिला लांबूनच आशीर्वाद देतो...तिला ही त्याने त्याच्या पध्दतीने केलेली क्षमाच आहे हे बाकीच्याना कळते...
हे कथानक मी थोडक्यात पण चित्रपटाला न्याय देत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातील विनोद, बराच तपशील अन् मुख्य अप्रतीम अभिनय यामुळे अविस्मरणीय होणारा हा चित्रपट प्रत्यक्ष पहायला हवा. त्या काळातले उघड प्रदर्शनाशिवाय गृहित धरलेले पतिपत्नीचे प्रेम अन् त्याबरोबर असणारी सुरक्षितता, पित्याचे मुलींवरचे प्रेम, बदलती सामाजिक स्थिती अन् या सर्वातून जाताना होणारी मनाची उलघाल याचे चित्रण परदेशात घर मांडून वेगळ्या संस्कृतीत मुलाना वाढवण्याची कसरत करणाऱ्याना जवळचे वाटावे असेच आहे. पहिल्यांदा हा चित्रपट पाह्यला तेंव्हा मुलीला परदेशी पाठवताना होणारी ताव्हियेची तळमळ पाहून प्रथम इकडे येताना विमानतळावर लाडक्या लेकीला नि पहिल्या नातवाला निरोप देताना गहिवरलेले माझे वडिल त्याच्या जागी दिसले....नंतर बघितला तेंव्हा आणखी काही जाणवलं.....प्रतिकुल परिस्थितीत ते लोक आपले अस्तित्व जपु बघत होते. घराबाहेर धोकाच जास्त, तरीहि आपली संस्कृति नि परंपरा त्यानी सोडल्या नाहीत.आवश्यक तेंव्हा तडजोड जरूर केली.ते पाहून मी खूप शिकले. इथे अमेरिकेत आम्ही जसे आहोत तसे राहू शकतो अन् लोक आमच्या विश्वासांचा आणि श्रद्धांचा आदरच करतात. व्यक्तिस्वातंत्र्य मोलाचं मानणारा हा देश. तुम्ही व्यक्ति म्हणून काय ते लोक महत्वाचं मानतात. आपल्या प्रथा समजावून सांगितल्या की त्याना आनंद होतो. वेगळा पेहेराव,लग्नपद्धती,कपाळावरचं कुंकु याबद्दल स्वाभाविक कुतुहल असते. पण आता जग लहान झाल्याने, दूरदर्शन, संगणकासारख्या गोष्टींमुळे याबद्दलचं अज्ञान दूर होऊन वेगळेपणाबद्दलची भीति नष्ट होतेय. आता सर्वत्र बरेच भारतीय आणि त्यांची दुसरी पिढी सर्व थरांमध्ये मोकळेपणे वावरत असल्याने तुम्ही परत जाणार का अन् कधी? असा प्रश्न कोणी विचारत नाही.

अनेक वर्षे इथे राहिल्यावर इथली संस्कृति समजावून घेता घेता आम्ही आपल्या रुढी,परंपरा याबद्दल विचार करु लागलो. पालक झाल्यावर मुलांच्या प्रश्नांना उचित उत्तरे देता देता तर ते अत्यावश्यक झाले. व्यक्तिस्वातंत्र्याचा वातावरणात वाढणारी मुले कोणतेहि नियम त्यामागची कारणमीमांसा पटल्याशिवाय स्वीकारायला तयार होत नाहीत. त्यामुळे इथे पालकाची भूमिका जबाबदारीने पार पाडायची तर ते नियम आपण समजून घ्यावे लागतात. परंपरांच्या मागचा अर्थ अभ्यासून त्यांची ह्या काळातली गरज,परदेशात या सांभाळण्याचे औचित्य वगैरे कसोट्या लावत अनावश्यक तपशील टाकून देऊन फक्त गाभा मनोभावे जतन करण्याची संवय लावून घ्यावी लागते. घरात पूर्णपणे भारतीय संस्कृति जपत आम्ही इथे राहू शकतो ही भाग्याची गोष्ट आहे.
या देशात नवीन असताना लक्षात आलेली एक प्रथा म्हणजे जेवण सुरु करण्यापूर्वी लोक प्रार्थना म्हणतात नि मग जेवण सुरु करतात. मग आम्हीहि मुलाना भगवत्गीतेतला
’ब्रह्मार्पणम्ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना’

हा श्लोक,आणि त्यापुढे,
हरिर्दाता हरिर्भोक्ता हरीरन्न प्रजापति
हरिर्विप्र शरीरस्तु भुङते भोजयते हरि:

तसेच वदनि कवळ घेता..........आणि जनी भोजनी नाम वाचे वदावे...हेहि म्हणायला शिकवले. मोठ्या मुलाने नातीना शिकवलेय आणि धाकट्या मुलाच्या छोट्याना पण हे हळुहळु कळू लागलय. पानातल्या अन्नावर एकदम तुटुन न पडता क्षणभर जेवण या क्रियेबद्दल विचार करण्याची सवय आपोआप लागते .हल्ली सर्वत्र पानातल्या पदार्थांचा चवीने आस्वाद घेत सावकाश जेवल्यास आपण आवश्यक तेवढच जेवून तृप्त होतो आणि वजन वाढणे टाळता येते असं ऐकतो, वाचतो. पहिल्या श्लोकात जेवण हा एक यज्ञ समजून अन्न,ते खाणारे अन् स्वीकारणारे नि भोजनाची क्रिया हे सारे ब्रह्मच आहे तर् दुसऱ्यात अन्न देणारा,त्याचा उपभोग घेणारा एकच हरि अशी भावना आहे.इथले लोकहि समोरच्या अन्नासाठी देवाला धन्यवाद देऊन जेवण सुरु करतात ते पाह्यल्यावर मुलाना आपली ही पद्धत शिकवणे सोपे गेले.

इथल्या अनेक चांगल्या गोष्टी शिकण्याची संधि इथे राहून मिळाली.मुख्य म्हणजे लोकांसाठी आमच्या रहाणीत नको ते बदल करण्याची गरज भासली नाही. जे प्रगतीसाठी महत्वाचे,खरोखर भल्यासाठी योग्य ते अनुकरण्याची शिकवण आईवडीलांकडून आणि उत्तम शिक्षक लाभल्याने शिक्षणातून मिळाली होती. लहानपणापासून ऐकलेल्या कथापुराणातल्या गोष्टींमधून नीर क्षीर विभेद करण्याचा विवेक लाभलेला, डोळ्यापुढे आदर्शहि चांगले होते. आम्ही उभयता एक विचाराने मुलाना वाढविल्यामुळे आपल्या संस्कृतीचा वारसा त्यांच्या हाती देणे अवघड नव्हते. फक्त ही धडपड लहान गावात म्हणून एकाकी होती. इतर भारतीय मंडळीच उत्तेजन देण्याऐवजी चेष्टेचे उद्गार काढीत. अमेरिकन परिचित मात्र मुले व आम्ही एकाहून अधिक भाषा बोलू शकतो याबद्दल कौतुकच करीत. दोन्ही मुले इथे वाढली तरी मराठी बोलता,लिहिता,वाचता येते याचे अनेकाना नवल वाटते. हल्ली तर मला मराठी मध्ये संगणकावर विशिष्ट जोडाक्षरे लिहायला जमलं नाही तेंव्हा मोठ्या मुलाने मदत करून लहानपणी त्याला मराठी लिहायला शिकवल्याचे सार्थक केले आहे! शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत संस्कृत शिकताना पहिला अर्धा तास बाबांशी, याची काय आवश्यकता आहे,कुणालाच (मित्रांपैकी) हे शिकावं लागत नाही....म्हणून वाद घालणारा हाच मुलगा गीतेतल्या श्लोकांबद्दल बाबांशी खरा अर्थ समजून चर्चा करतो तेंव्हा बाबाना जो आनंद मिळतो तो व्यक्त करायला शब्द नाहीत.
हा समृध्द देश म्हणजे कॅटलॉगचं जग! तुमच्याकडे काय आहे त्यात समाधान मानण्याऐवजी काय नाही अन् ते सर्व घेतल्याने आयुष्य अधिक सुखाचे कसे होईल हे सुचवणारे संदेश सर्वत्र सतत मिळत असतात. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरवताना प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागते. मुले मोठी झाली तसे त्यांचे विचारहि कधीकधी पटवून घ्यावे लागतात. प्रतिकूल परिस्थितीतून आलेले आम्ही दोघे, अनेक गोष्टी असेल त्यात भागवून अवघड मार्गाने करायची सवय अंगवळणी पडलेली. अडून न बसता असे काम चालवून घेणे हा सद्गुण मानणाऱ्यांपैकी. ते नेहमीच शहाणपणाचे नसते हे मुलांनी लक्षात आणून दिले. इथे लोक प्रत्येक कामासाठी योग्य ती हत्यारे,कपडे,बूट ,डोळ्यांचे संरक्षण आवश्यक असते तेंव्हा खास चष्मा इ. वापरतात. त्यामुळे काम करणे सुखकर होऊन कामात सफाई येते. खेळाच्या बाबतीत हे सांभाळल्याने शरीराला दीर्घ काळाने उद्भवणारे आजार टाळता येतात. हे पटल्यामुळे आता सेलवर स्वस्त म्हणुन वस्तू न घेता विचारपूर्वक खरेदी करण्याची सवय लागली. धाकट्याने एकदा असच कोणतेहि काम करण्याची फक्त आपली रीत बरोबर अस समजणं किती चुकीच हे दाखवून दिल्यावर नकळत ही चूक आपण बरेचदा केल्याच जाणवलं. थोडक्यात पालक म्हणून आम्हीहि मुलाना इथे वाढवताना खुप शिकलो, मुख्य म्हणजे चूक मान्य करून योग्य ते बदल आनंदाने करण्याचे उदाहरण त्यांच्यापुढे ठेवण्यात कमीपणा वाटला नाही. या बदलामुळे झालेल्या फायद्याबद्दल त्यांचे कौतुकहि करतो. आता तर दोघेहि महत्वाच्या बाबींमध्ये सल्ला घेण्याइतके मोठे झालेत.

एकूण गेल्या अडतीस वर्षांच्या इथल्या वास्तव्यात स्वत:कडे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघून आवश्यक ते बदल जरूर केले. मात्र विचारात आपल्या संस्कारांचे भान, आचारात पार्श्वभूमीचा अभिमान आणि महत्वाचे निर्णय घेताना मोडेपर्यंत न वाकण्याचे धैर्य सतत आहे!

- मनीषा सु. पंडित, होटन,मिशिगन

No comments: