Monday, September 15, 2008

9/11 चा दुर्दैवी स्मृतिदिन

सप्टेंबर 9/11... अमेरिकेच्या जगण्यातला काळा दिवस... आणि पराभूत दिवस... त्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी हजर राहून एक अनुभव घेतला. त्याबद्दल -न्यूयॉर्क महानगर... कलती संध्याकाळ... दिवस नऊ सप्टेंबरचा... मॅनहटनमध्ये दिवसभर फिरून संध्याकाळ या दिवसाचा अनुभव घेण्यासाठी खास राखून ठेवलेली... अमेरिकेखेरीज उर्वरित जगाच्या तात्पुरता का होईना विस्मृतीत गेलेला हा काळा दिवस... मूलतत्ववाद्यांची दहशत आणि इतर बरंच काही... मॅनहॅटनच्या मोठ्या कारपार्कमध्ये कार पार्क केली आणि आम्ही गगनभेदी इमारतींच्या मधून पायी चालायला लागलो. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने.... त्या दिवसापुरती म्हणजे 9/11 च्या स्मृतिदिनानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आसपासचा बराच भाग वाहनांसाठी बंद ठेवला होता.

नियमभंग ही पाच अक्षरं अमेरिकेच्या शब्दकोशातच नाहीत. त्यामुळे स्वयंस्फूर्तीनेच ही शिस्त पाळली होती. वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे अनेक अमेरिकेन्सची पावले निघाली होती. पण गर्दी नव्हती की गडबड नव्हती आणि एरवीही अमेरिकन्स एकमेकांशी गप्पा मारीत किंवा बोलत बोलत ड्राईव्ह करत नाहीत आणि चालत तर नाहीच नाहीत. आजचा दिवस तर वेगळाच होता. बरेच सिनिअर्स काळ्या कपड्यात होते आणि हे कपडे युरोपियन पद्धतीचे होते. म्हणजे स्त्रिया स्कर्ट ब्लाऊजेस आणि स्कार्फ घालून आणि पुरुष ट्राऊझर्स शर्टसमध्ये. हे मुद्दाम लक्षात आलं, कारण एरवी सर्वच यू.एस. पब्लिक लहानांपासून सिनिअर्स सिटिझन्सपर्यंत शॉर्टसटॉप आणि सॉक्‍स शूजमध्येच पाहत होतो... आणखी एक गोष्ट म्हणजे कोणाच्याही बरोबर छोटी मुले, प्रॅममधली तान्हुली नव्हती. ही गोष्ट आवर्जून केलेली असावी. कारण हा पिकनिक स्पॉट नव्हता.

एका गोष्टीचं नवल वाटत राहिलं, की स्मृतिस्थानी जाणाऱ्यांपैकी इंडियन्स फक्त आम्हीच होतो. एरवी न्यूयॉर्कमध्ये इंडियन्सची संख्या भरपूरच. प्रत्येक चार माणसांमागे एक इंडियन असणारं न्यूयॉर्क. फार काय, दुपारच्या वेळी मॅनहॅटनच्या रोडवरती, एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये, मॅकनॉल्डमध्ये, वॉल स्ट्रीटवरती आणि टाईम स्क्वेअरवरती नाना प्रांतीचे इंडियन्स दिसत होते. इंडिपेंडंट परेड दिवशी तर एक लाख इंडियन्स (सिटिझन्स ऑफ यू.एस.ए.) न्यूयॉर्कमध्ये दिसले आणि या ठिकाणी मात्र आम्ही दोघे आणि आमचा मुलगा एवढंच त्रिकूट असावं, याचं आश्‍चर्य वाटलं. "आपण ज्या जगात राहतो त्याबद्दलची अनुत्सुकता, औदासीन्य की..?' की "आपला आपला कळप बरा' ही संकुचित वृत्ती? अनेक प्रश्‍न मनात घोळवीत आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलो.वर्ल्ड ट्रेड सेंटर! जगातले मोठे व्यापारी संकुल! शान-ए-अमेरिका! आता तिथे मोकळे मैदान (अतिप्रचंड) होते आणि आठ-दहा फूट उंचीचे फेन्सिंग. एखादं समृद्ध राज्य अचानक, एकदम, उद्‌ध्वस्त व्हावं तसंच... सर्वत्र अतीव शांतता. शांततेला एक उदास काजळतडा होती. तशीही एरवीही अमेरिकेत कायम शांतताच असते. पब्लिक प्लेसमधल्या गद्या, रेकॉर्डवरची गाणी, छे छे छज! आणि अशी वस्तुस्थिती असताना धाडधाडधाड आवाज? कुठून? एवढ्यात बेसमेंटमधून लिफ्टने अनेक प्रवासी ग्राऊंड फ्लोअरवर आले. म्हणजे पूर्वीच्या वास्तूच्या खाली (भुयारात) चक्क एक अंडरग्राऊंड रेल्वेस्टेशन होते. अमेरिकेत हे एक नवलच आहे. ग्राऊंड फ्लोअरवरती मोठा मॉल आणि खाली रेल्वे धडधडत असते.

बेसमेंटमधून ग्राऊंड फ्लोअरवर आलेले प्रवासीही घटनास्थळाला भेट द्यायलाच आले होते. अनेक जणांच्या हातात फुले होती. छोटी पुष्पचक्रेही होती. जवळपास काही फुलांचे विक्रीचे तात्पुरते उभे केलेले स्टॉल्सही होते. प्रत्येक बुकेवरती प्राईज टॅग. विक्रेतेही काळ्या कपड्यातच होते. प्राईज टॅग अगदी कमी डॉलर्सचे होते. हे मुद्दाम लक्षात आलं. कारण परिस्थितीचा (सुखाच्या/ दुःखाचा) फायदा घेऊन कशाचाही धंदा आपल्याकडे होतो. व्यापारी वृत्तीच्या अमेरिकेच्या संदर्भात मला ही धंदा न करण्याची वृत्ती कौतुकास्पद वाटली.

आणखी एक गोष्ट विशेष जाणवत होती. 9/11 ची घटना निंदनीय होती आणि आहेच. तरीही कुठेही निषेधाचे नारे नव्हते. देशप्रेमाचे जाहीर प्रदर्शन नव्हते, की लादेन किंवा तशाच कुणी मूलतत्ववाद्यांचे निषेधाचे होर्डिंग्ज नव्हते. सर्वत्र एकच फलक - वुई वॉन्ट पीस! वुई वॉन्ट पीस! दॅट्‌स दॅट!

काही ठिकाणी धर्मगुरू म्हणजे फादर - प्रिस्ट, खाली मॅट घालून शांतपणे बायबल वाचत होते, तर ज्यांची मुले, नातलग त्या दुर्घटनेत मृत्यू पावले होते, ती माणसे फेन्सिंगपाशी शांत उभी होती. फेन्सिंगवरती मृत व्यक्तीचे फोटो लावले होते. तरुण, डोळ्यात जीवनाची उभारी, उत्साही असे युवकांचे फोटो आणि त्यापुढे मेणबत्ती लावून शांतपणे उभी असलेले त्यांचे आईवडील. आणखी कोणी... अनेक डोळे पाणावलेले. स्त्रिया तर थेट रडत होत्या... भावनाप्रधानता ही सर्वत्र असते. त्यावर कोणा एका संस्कृतीचा अधिकार नसतो. याची लख्ख जाणीव झाली.

समोरच एक मोठी वॉल आहे. त्यावरती वुई आर प्राऊड ऑफ अवर ब्रेव्हज्‌! अशा बोर्डखाली त्या दुर्घटनेत ज्या पोलिसांनी, फायर फायटर्सनी शौर्य गाजवले, आपल्या जिवाकडे न पाहता लोकांना मदत केली, त्यांचे फोटो लावून गौरव केला होता.

त्या एरियात सर्वत्र अमेरिकेचा जगज्जेता फ्लॅग वाऱ्याने विहरत होता. एक नाही... दोन नाहीत.... शेकड्यांनी फ्लॅग्ज... वुई आर नंबर वन ची ग्वाही देणारे फ्लॅग्ज. फेन्सिंगजवळ एक प्रचंड मोठा पेपर पसरला होता. वुई वॉन्ट पिस... आलेला प्रत्येक जण मूकपणे संमतीदर्शक सही करीत होता. मीसुद्धा पुढे झाले. सही केली. एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता. अमेरिकन पावले आली तितक्‍याच शांतपणे परत फिरत होती. कुठेही आवाज नाही. गोंगाट तर दूरचाच. दुःख व्यक्त करण्याची त्याचबरोबर निर्भय असल्याची ग्वाही देणाऱ्यांची ही अमेरिकन पद्धत मी याची देही याची डोळा अनुभवली. जगात हे राष्ट्र नंबर वनवरती का? याचा कितव्यांदा तरी पुनःप्रत्यय आला. आमेन!

- डॉ. सुवर्णा दिवेकर, पुणे.

आपले अनुभव शेअर करा pailteer@esakal.com

Monday, September 8, 2008

घर...व्हीलचेअरशी मैत्री असणारं...

माझं पांघरुण... माझं पेन... माझी बाहुली... माझी आई नि माझेच बाबा! आपल्या वस्तूंविषयी, माणसांविषयी विलक्षण "पझेसिव्हनेस' आपल्या मनात अगदी बालपणापासून कसा ठासून भरलेला असतो... मग आपला जास्तीत जास्त काळ जिथं व्यतीत होतो त्या आपल्या घराविषयी आपल्या काय भावना असतात बरं... अगदी "आपली माणसं' जिथं असतात ते घर? ... जिथं आपली स्वप्न जोजवता आणि फुलवता येतात ते घर? ... की ऊन, वारा, पाऊस यांपासून आपलं रक्षण करीत एक सुरक्षिततेची भावना जागवतं ते घर?

माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांच्या रंगपंचमीत(आवडीचे अन्‌ नावडीचे दोन्ही रंगांची उधळण यात यथेच्छ आहे) माझ्या घराविषयीच्या कल्पना कदाचित अधिकच तरल झाल्या. मला स्वत:ला स्वप्न जोजवणं आणि फुलवणं यासाठी संपूर्ण अवकाश देणारं घर भावत आलंय... आणि स्वत:ची स्वप्न जोजवणं, फुलवणं हे स्वत:ला घरात अतिशय मोकळेपणानं वावरता आल्याखेरीज, आपल्या आवडीचं सर्व काही स्वत:करता आल्याशिवाय कसं शक्‍य आहे?

घरच हरवलं.....

थोडी मागे घेऊन जाते आता तुम्हाला... माझ्या वयाच्या नवव्या वर्षात! खेळ, दंगाधुडगूस, भांडणं, गावभर भटकणं .. अभ्यास .. ह्यांव आणि त्यांव असं बालपण चालू होतं.. अचानक एका अपघाताला मी गाठलं.. माझे बाळपणीचे उपद्‌व्याप ज्या बळावर चालू होतं ते माझ्या कमरेतील व पायातील बळ मी यात गमावलं... आणि उपचार नि दवाखाने या चरकात घरापासून शेकडो मैल दूर, आईबाबांच्या उबेविना राहताना "घर' म्हणजे काय हे आसुसून कळायला लागलं ...

पण खरं सांगू? ... हॉस्पिटलमध्ये आणि दीड वर्षाने तेथून डिस्‌चार्ज मिळाल्यावर घरी भेटायला येणाऱ्या लोकांना आता मी कधीच चालू शकणार नाही हे समजल्यावर "काय झालं?, पुढचं काय?' या विषयाखेरीज माझ्याशी संवाद साधायला, बोलायला प्रश्‍न सापडेनातच कदाचित.. मग शक्‍यतो लोकांना टाळलेलं बरं अशी माझी धारणा पक्की होऊ लागली. कधी कधी उद्धटपणाकडे जाणारी तुटक उत्तरं देणं हा माझा स्वभावधर्म बनत चालला. काही खरोखर समजून घेणाऱ्या मैत्रिणी, सगळे लाड पुरविणारं, आलेल्या न्यूनानं न हिणवणारं घर आई-बाबा-बहीण यांच्या मायेची ऊब लाभल्यानं, माझा लोभस, निखळ वागण्याचा मूळ स्वभाव तरीही चिवटपणे तग धरून होता.

पण मी माझं "खास' काही हरवलं होतं याची रुखरुख होतीच! फक्‍त पाय गमावल्याची ही रुखरुख होती का? विचार करकरून कळलं की आपण कदाचित आपलं "घर' हरवलंय! .. आपण तर घरातच राहतोय की.. खरं तर अशा परिस्थितीत आपण घरात नसतो तर जगातही नसतोच, पण या घरात मी आता स्वत:ची स्वत: काहीच करू शकत नव्हते. मग, हे "माझं' घर कसं म्हणता येईल? फक्‍त मायेची माणसं असणं आणि अन्न, वस्त्र, निवारा आदी गरजा भागविल्या जाण्याचं ठिकाण म्हणजे "घर'असतं का?

अपघातपर्वापूर्वी "घर' जेवण-खाणं, झोप, नि आईबाबांना तऱ्हतऱ्हेच्या मागण्या करून पुरवून घेण्याचं ठिकाण होतं.. बाकी इतर कशासाठी मी घरी कुठं असायचे? सतत आपली वाऱ्यावर उधळलेली! - पण उधळण्यासाठीचा "पाय' (नि कमरेखालच्या संवेदना गमावल्यामुळे लघवी-संडास वरील नियंत्रणही गमावल्यानंतर) हा अवयव वजा झाल्यावर "घरा'च्या व्याख्येत खूपखूप फरक पडला. स्वत:चं स्वत:ला काहीच करता येत नव्हतं.. अगदी शी-शू करायची तरीही कोणाची ना कोणाची मदत लागायची.
मुंबईतील हॉस्पिटलमधून जवळ-जवळ दीड वर्षानी गावी; बत्तीस शिराळ्याला, परत आल्यावर दैनंदिन व्यवहार म्हणजे आई-बाबांची नोकरी, धाकट्या बहिणीची-संपदाची शाळा (माझ्या अडचणींमुळे शाळेत मी जात नसे) सुरू झाल्यावर घर "अनोळखी' वाटायला सुरुवात झाली. आता भूक लागल्यावर मनाला हवा तो डबा हवा तेव्हा नव्हता उघडता येत ! बाथरूम वगैरेसाठी सरपटत जायचे किंवा बाबा असल्यास उचलून न्यायचे. घरात उंबरेच उंबरे. यामुळे फार सरपटासरपटी करणे आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीनं धोक्‍याचं ठरे. साधा टी. व्ही. लावायचा तर शाळेत जाताना आईनं आठवणीनं वरचा स्वीच चालू ठेवला तर खालून चालू करता येई. कधी कधी गडबडीत ती विसरे नि मग छोट्या छोट्या गोष्टीतही माझी चिडचिड सुरू होई. बिचारे आईबाबा सगळं हातात देत, पण त्यानं माझं मुळातून समाधान होत नव्हतं, ते कसं मिळवावं कळत नव्हतं. शिक्षणात माझी प्रगती बरी होती. 10 वीला शाळेत न जाणारी मी शाळेत पहिली आले. असं करत बी.ए.च्या शेवटच्या वर्षांत असताना माझ्या एका मित्राने मी आजवर टाळत आलेला प्रश्‍न मला पुन्हापुन्हा विचारला. भयंकर अस्वस्थ केलं. तो प्रश्‍न होता. "आईबाबांनंतर तुझं काय?'

खूप विचार करून काही काळापुरतं "घर' सोडायचा प्रयोग करून पहावा हे ठरवलं, पण जिथं मी काहीच मनात येईल ते करू शकत नव्हते ते ठिकाण सोडणं म्हणजे "घर' सोडणं होतं का? - नाही. मी मला मनानं "सिक्‍युअर' ठेवणारी घर ही भावना नि माझी माणसं सोडणार होते. धाडसच होतं ते! पण ठरवलं अखेर...

घराच्या शोधात

कोल्हापूरची हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड ही संस्था. संस्थेच्या उंचगाव येथील, अपंग व्यक्तींच्या शारीरिक अडचणींचा खोलात विचार करून बांधलेल्या "घरौंदा' या वसतिगृहात मी राहायला, स्वावलंबन (शारीरिक व आर्थिक) शिकायला म्हणून 2000मध्ये प्रवेश केला आणि आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. अर्थात तत्पूर्वी बी.ए.ची पदवी मी चांगल्या प्रकारे संपादन केलेली होती. इथं मी सर्वप्रथम मला स्वतंत्र करणारी व्हीलचेअर वापरायला शिकले. लघवी-संडासवरील नियंत्रण शक्‍य नाही हे स्वीकारून डायपर व टॉयलेटला जाण्यासाठीच्या वेळापत्रकाशी दिनक्रम बांधायला शिकले. संवेदनक्षम आणि बोलक्‍या स्वभावानं उत्तम माणसांचं वैभव साठत गेलं, समृद्ध करत गेलं. माझ्या पळत्या उत्सुक चाकांना भुई थोडी झाली.
आता थकलेल्या देहाला आणि मनालाही शांतवणारे "घर' शोधणे ही भूक स्वस्थ राहू देईना. वसतिगृहाच्या चाकोरीत सोयी मिळतील, सुरक्षितता मिळेल, पण जन्माचा शिणवटा घालवणारं "घर' मिळेल का? या प्रश्‍नाशी झगडताना मी पुन्हा एक धाडस डोळसपणे करायचं ठरवलं. आईबाबांशी बोलले. जीवनाच्या संथ-शांत प्रवाहाला खळाळता झरा करण्याच्या माझ्या प्रस्तावाला खूप चर्चेअंती सर्वानुमती मिळाली नि अखंड शोधत राहिल्यावर कोल्हापुरात शिवाजीपेठेत तळमजल्यावर आम्ही एक ब्लॉक घेतला. आता त्याला "घरा'त बदलायचं होतं. सुंदर जगण्याच्या आसक्तीमुळं हे आव्हान मी व माझ्या कोल्हापुरातील पालकमंडळींनी पेलायचं ठरवलं. आईबाबा नोकरी सोडून, तेथील जगण्याशी त्यांची जुळलेली नाळ तोडून येऊ शकत नव्हते. माझे पंख मजबूत करून हे घरटं माझ्या मनाच्या ताकदीनं विणणं हा आनंद मला उपभोगायचाच होता..

व्हीलचेअरशी मैत्री करणारं घर

नोकरी व वसतिगृह सोडण्यापूर्वी घरात योग्य असे बदल करून मगच आपल्या घरी यावं असं ठरलं. स्वत:च्या घरासाठी बाथरूममधल्या टाईल्स निवडणं, खोल्यांसाठीचा रंग निवडणं या साऱ्या गोष्टी करताना आनंदाचा झरा मनात खोलखोल झुळझुळू लागला.

मी व्हीलचेअरचा वापर करणारी; त्यामुळे मला स्वत:ला घरातील तसेच स्वत:चे सर्व व्यवहार स्वत: करता येणं महत्त्वाचं होतं. त्यादृष्टीनं काय काय करायला हवं याची यादीच बनवली आणि सगळं काही मनासारखं करून घेतलं. नव्या बांधकामांमध्ये तळमजल्यावरची जागा म्हणजे एक तर पार्किंगसाठी किंवा दुकानगाळ्यांसाठी असे समीकरण बनले असल्याने आधीच शहरातील जुन्या फ्लॅट सिस्टिममधे तळमजल्यावरचा फ्लॅट शोधलेला होता. बाकी करून घेतलेल्या गोष्टी अशा -

- घरात स्वत: जाता यावं किंवा स्वावलंबीपणे बाहेर जाता यावं यासाठी गॅलरीवजा जागेची भिंत फोडून तिथे योग्य उतार असणारा सिमेंट कॉंक्रीटचा रॅंप.
- रॅंप करताना गॅलरीचा भाग तोडून काढला, त्यामुळे सुरक्षिततेचा नवा प्रश्‍न तयार झाला. त्यावर उपाय म्हणून पूर्ण लोखंडी जाळी आणि गॅलरीतून प्रवेश करण्याच्या ठिकाणी सहजपणे उघडेल असे सरकते लोखंडी दार.
- रॅंपचा उपयोग करून मी घरात आले तर थेट झोपण्याच्या खोलीत पोहोचत होते. सर्वांना थेट झोपण्याच्या खोलीतून घरात कसं घ्यायचं, मग माझ्या प्रायव्हसीचं काय? नवा प्रश्‍न! - उत्तर सोपं होतं.. रॅंप असलेला दरवाजा फक्त माझ्यासाठी!
- बाहेरून मी घरी आले किंवा अचानक घरात कोणी नसताना अंधारून आलं तर मी लाईट कशी लावणार?... हे जाणवलं तेव्हा प्रत्येक खोलीतले लाईटचे स्वीच जमिनीपासून अवघ्या अडीच फूट उंचीवर आणि दरवाजालगत करून घेतले.
- घरात कमीत कमी सामान आणि व्हीलचेअरवरून फिरताना त्याचा अजिबात अडथळा होऊ नये अशा पद्धतीची मांडणी जाणीवपूर्वक केलेली. आवश्‍यक म्हणून एकच लोखंडी कपाट; पण त्याची उंचीदेखील साडेतीन फूटापेक्षा अधिक नाही.
- संडास व लघवीवर नियंत्रण नसणाऱ्या व व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तीसाठी घरामध्ये अत्यंत महत्वाची जागा म्हणजे स्नानगृह व स्वच्छतागृह!
- व्हीलचेअरवरूनच बाथरुममध्ये जायचं तर त्यासाठी तितका रुंद दरवाजा हवा. व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीला तो स्वत: उघडता व बंद करता यायला हवा.. आणि चुकून कधी मदतीची गरज लागली तर बाहेरच्या माणसाला दरवाजा फोडून किंवा उघडून सहज आत येता यायला हवं! रात्रीच्या वेळी स्वच्छतागृहात जाण्याची गरज लागतेच; तेव्हा ते झोपण्याच्या खोलीशी जोडलेलं हवं. मीदेखील झोपण्याच्या खोलीतूनच टॉयलेट कम बाथरूममध्ये जाण्यासाठी ऍल्युमिनिअमची फम आणि त्यामध्ये प्री लॅमिनेड प्लायवूडचे तक्ते अशा प्रकारचा वजनाने हलका व सरकता दरवाजा करून घेतला.
- व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तीसाठी स्वावलंबीपणाने अंघोळ करायची तर ती कमोडवर बसून करावी लागते. साहजिकच कमोडच्या शेजारी गरम व गार पाण्यासाठी बादली ठेवता येईल अशी जागा आणि नळांची किंवा शॉवरच्या कॉकची व्यवस्था करणे ओघाने आले. सहजपणाने नळ सुरू किंवा बंद करता येतील अशा पद्धतीने मी नळांची सुविधा करून घेतली.
- व्हीलचेअरवरून स्वत:चं स्वत: कमोडवर जाता येणं आणि कमोडवरून पुन्हा व्हीलचेअरवर येणं यासाठी कमरेपासून खाली ताकद नसलेल्या माणसाला आणि घरातील वृद्ध व्यक्तींनाही हातातील जोरच वापरावा लागतो आणि त्यासाठी आधाराची गरज भासते. एक ते सव्वा इंच व्यासाचे स्टेनलेस स्टीलचे मजबूत पाईप्स कमोडच्या दोनही बाजूला योग्य अंतरावर फिक्‍स केले तर हा प्रश्‍न सुटतो. अशा प्रकारचे बार मजबूत बसावेत यासाठी जमिनीत फूटभर खोल आणि भिंतीत सहा इंच असे बसवून घेतले.
- कमोड ही माझी गरज असली तरी माझ्या आई-वडिलांना कमोडची सवय नाही. ते राहायला आले की त्यांची गैरसोय होऊ नये हे कसे पाहाणार? - यामुळे गरज नसेल तेव्हा फोल्ड करता येईल असे कमोड वापरले.
- अंघोळ कमोडवर बसून करायची तर कपडे ठेवायला आणि वाळत घालायला असा वेगळा बार कमोडजवळच नको? - तोही बसवून घेतला.
- पॅराप्लेजिक व्यक्तीला कपडे बदलायचे तर त्यासाठी बेडवर येऊन कपडे बदलावे लागतात. नेमकं त्याच वेळी कोणी खोलीत आलं तर...त्यापेक्षा बाथरुमलगतच छोटी जागा उपलब्ध होती ती चेंजिंग स्पेस म्हणून विकसित केली. तिथे एक छोटा बेड. त्याच उंचीला भिंतीवर आरसा, सौंदर्यप्रसाधने ठेवण्याचे कप्पे, सॅनिटेशन मटेरिअलचे कप्पेही.
- आता स्वयंपाकघर. व्हीलचेअरवर बसून स्वयंपाक करता येईल अशा पद्धतीने किचनच्या कट्ट्याची उंची कमी ठेवली. व्हीलचेअर आत जाऊ शकावी म्हणून कट्टयाखाली कपाटे किंवा रॅक्‍सना नकार. बाथरुम तसेच किचनमधील बेसिन्सही व्हीलचेअरवरून जाऊन वापरता येतील अशा उंचीवर!
- हॉल म्हणजेच कामाची जागा. याठिकाणी कॉंप्युटर्स कमी उंची असलेल्या टेबलावर प्रतष्ठापना केलेले!
सारं काही मनासारखं. मला जे हवं ते करण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागू नये असं!

प्रवेश "माझ्या' घरात

15 एप्रिल 2007 ला मी या माझ्या स्वत:च्या घरात आले नि आनंदाने वेडावून गेले. माझ्या बेडरुममध्ये मी एकटी! हवंहवंसं एकटेपण प्रथमच अनुभवत होते. "घर' सापडलेच होते खूप वाट पाहिल्यावर, खूप शोध घेतल्यावर!
आता स्वावलंबीपणानं जगू पाहाणाऱ्या अपंग व्यक्तींसाठीचं घर कसं असावं हे समजावून घ्यायला लोक माझ्या घराला भेट देतात.

फोनवरून त्याबाबत माहिती विचारतात आणि पुन्हा खात्री पटते.. आपण घेतलेला निर्णय, उचललेली पाऊले चुकीची तर नाहीतच पण इतरांनाही हवीहवीशी वाटणारी आहेत.

हे सगळं अनुभवणं "घरा'मुळेच शक्‍य होतेय...तब्येतीत जगायचं तर तब्येत सांभाळणं आलंच! तिची कुरबूर चालू असते.. पण "माझ्या' घरात आजारी असणं हा भागही मी एन्जॉय करतेय .. यामुळं थोडा काळ जीवनाचा खळाळणारा झरा थांबला तरी वाटतं -

"राहों पे चलते चलते जब रुक जाए मेरे कदम
बेवक्‍त...
तब मुझे एहसास हुआ रफ्तार की अहमियत का।
शायद ...
रगों में हौसला भरने के लिए ही,
रुकी हूँ मै!'
या ओळी असतात हातात हात घेऊन सज्ज पुढील प्रवासासाठी...!

- सोनाली नवांगुळ

Tuesday, September 2, 2008

ताव्हिये, परंपरा आणि आम्ही परदेशातले पालक

काही चित्रपट थोडा वेळ आपली करमणूक करतात,काही हसवतात,काही त्यातल्या गूढ घटनांनी विस्मित करतात,काही मनात विचारांची खळबळ उडवतात तर काहींमधलं नाट्य व सर्व रस इतके कलात्मकतेने चित्रित केलेले असतात की पुन्हा पुन्हा पहावं तर वेगळ काहीतरी लक्षात येतं. संवाद, अभिनय यातलं सूक्ष्म दिग्दर्शन नैपुण्य जाणवतं. असे चित्रपट मोजकेच! त्यापैकी आमचा खास आवडता म्हणजे ’Fiddler On The Roof'. हा तसा आता जुन्यापैकी पण अजूनहि बघितला की काहीतरी नवीन लक्षात येतं. याचं कथानक,गाणी अन् अभिनय सारंच अप्रतिम आहे.हा इथे Broadway show म्हणुनहि गाजला. आम्हा परदेशात रहाणारांना विशेष जिव्हाळ्याचा वाटावा असा हा चित्रपट. कारण यातल्या बऱ्याच छोट्या मोठ्या समस्या परक्या संस्कृतीत संसार करताना कुठल्या ना कुठल्या स्वरुपात सोडवायची वेळ आलेली असते. काळ बदलला, समस्यांचे संदर्भ बदलले तरी त्यामागची भावना बदलत नाही आणि श्रद्धाना आव्हान करणारी समस्या उद्भवली तर मनात होणारे द्वंद्वहि तेवढेच क्लेशदायक... उरी जपलेले स्वप्न वाटचाल करायला जिद्द देत असते, पण अनेकदा संस्कार, मूल्ये कसाला लागतात. त्यावेळचे निर्णय आयुष्य व्यापणारे...सगळ्या कुटुंबाला दिशा देणारे...असंच काही या चित्रपटात जाणवतं आणि ताव्हियाच्या भूमिकेत इथल्या भारतीय पालकांचे प्रतिबिंब दिसते...

प्रथम या चित्रपटाविषयी -

झारच्या कारकिर्दीत रशियामध्ये रहाणाऱ्या ज्युइश लोकांच्या जीवनाचे फार सुंदर चित्रण त्यात केले आहे. त्यातली ताव्हियेची भूमिका मला फार आवडते. सुरुवातीलाच त्याचे जे स्वगत आहे, त्यात ख्रिस्चन लोकांच्या (आनातेव्हका) या गावात ही ज्यु कुटुंबे कशी सलोख्याने रहात असतात त्याचे वर्णन तो करतो. कुणी कुणाच्या अध्यात ना मध्यात. गरजेप्रमाणे एकमेकांचे गुण दोष डोळ्याआड करीत, एकमेकाना सांभाळून घेत सर्वांचे जीवन चालू. या छोट्या गावात रहाणे म्हणजे छपरावर उभं राहून फिडल वाजवताना तोल सांभाळणे अवघड, तसे. पण हा तोल कसा सांभाळतात? तर त्याचं उत्तर म्हणजे ’परंपरा’! सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत या परंपरा सांभाळीत सगळे व्यवहार,त्यांचा पेहराव, बोलणं, मुलांचं शिक्षण, त्यांची मध्यस्थातर्फे लग्ने जुळणं हे चालतं. परंपरांशिवाय जीवन अस्थिर होईल, परंपरा माणसाला स्वत:ची ओळख देतात अन् देव त्याच्याकडून काय अपेक्षितो ते शिकवतात अशी अढळ निष्ठा असलेला हा ताव्हिये पाच मुलींचा पिता पण देवावर श्रद्धा ठेवून आपला गरीबीचा संसार रेटत असतो. आपण श्रीमंत झालो तर मोठ्या हवेलीत बायकोला- गोल्डीला, ऐषआरामात ऐटीत वावरताना पाहू आणि लोक आपली मते आदराने ऐकतील अशी दिवास्वप्ने बघतो. पाचहि मुलीना चांगले नवरे मिळून त्या सुखात रहाव्या अशी दोघांची स्वाभाविक कळकळ. त्या काळात मध्यस्थातर्फेच लग्न जुळवण्याची पद्धत त्यामुळे अशा मध्यस्थाने सुचवलेल्या मुलाशी विशेषत: गरीब मुलीने न कुरकुरता लग्न करावे अशी अपेक्षा असे. अशा काळातहि प्रगतीसाठी उत्सुक असलेला ताव्हिये एका उमद्या शिक्षकाला मदत होईल अशी संधि दिसताच त्याला आपल्या मुलीना शिक्षण द्यायला आपल्या घरी ठेवून घेतो. दरम्यान एका वृद्ध महिलेच्या मध्यस्थीने तो मोठ्या मुलीचे लग्न एका वयस्क, श्रीमंत विधुर खाटकाशी ठरवतो. आपल्या मुलीला कशाची विवंचना रहाणार नाही हे समाधान त्याला ह्या संबंधात वाटते. त्या आनंदात असतानाच त्याच्याशी मित्रत्वाने वागणारा गावातला रशियन अधिकारी लवकरच काही निदर्शने होणार असल्याची सुचना त्याला देतो आणि बदलणाऱ्या वातावरणाची चाहूल लागते...

दुसऱ्या दिवशी गावातल्याच एका शिंप्याकडून जेंव्हा त्याचे या मुलीवर प्रेम असून ते दोघे वचनबद्धहि झाल्याचे कळते, मुलीला खाटकाशी लग्न अजिबात करायचे नाही हे लक्षात येते तेंव्हा तो त्याना लग्नाला अनुमति देतो, त्या दोघांचा आनंद पाहून सुखावतो आणि युक्तीने बायकोला खाटकाशी ठरलेला मुलीचा विवाहसंबंध चुकीचा असल्याचे पटवतो आणि मुलीचे लग्न त्या शिंप्याशी करून देतो. लग्न समारंभ साजरा होत असतानाच रशियन मिलिटरीचे लोक येऊन सारं उध्वस्त करतात. ताव्हियेबद्दल आदर असणारा तो रशियन अधिकारी त्याची माफी मागून आपला नाइलाज झाल्याचे सांगतो. ताव्हिये सुन्न, अवाक्, जणु गोठून जातो... या सुमारास राजकीय वातावरण तंग होऊ लागल्याच्या बातम्या येत असतात...
ताव्हियेची दुसरी मुलगी क्रांतिकारक विचाराच्या या शिक्षकाच्या प्रेमात पडते. तो त्या वेळी अन्यायी राजवटीला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर काम करण्यासाठी कियेव नावाच्या गावी जातो आणि काही दिवसानी या मुलीला पत्र पाठवून बोलावून घेतो.तिला लग्नाशिवाय असे दूर पाठवणे म्हणजे परंपरांनुसार प्रत्येक निर्णय घेणाऱ्या ताव्हियेला मोठच आव्हान.पण याहि वेळी मुलीवरचे त्याचे प्रेम त्याला हे धाडस करायला तयार करते आणि तो जड अंत:करणाने तिला निरोप देतो, तिकडे गेल्यावर आधी धार्मिक पद्धतीने लग्न करण्याचे आश्वासन ती देते आणि ’तिला सुखरुप ठेव, थंड प्रदेशात उबेत ठेव’म्हणून तो देवाची प्रार्थना करतो.
एव्हाना मोठ्या मुलीचे व तिच्या नवऱ्याचे चांगले बस्तान बसलेले असते, तिला मुलगा होतो, त्याने मागवलेल्या शिवणाच्या मशीनचे सर्वांकडून कौतुक होते कारण त्याचा व्यवसाय उत्तम चालल्याचे ते प्रमाणपत्र! या सुमारास तिसऱ्या मुलीचा एका ख्रिश्चन मुलीशी झालेला परिचय ताव्हियेला आवडत नाही आणि परत त्याची कसोटीची वेळ येते. ही मुलगी पळून जाऊन त्या मुलाशी लग्न करते, हा मुलगा चांगला असतो पण ताव्हियेला हे लग्न स्वीकारणे अशक्य वाटते. ती मुलगी जेंव्हा त्याची क्षमा मागायला येते तेंव्हा तो स्वत:शी म्हणतो, ’आजपर्यंत मी खूप तडजोड केली...पण या वेळी तडजोडीसाठी मी आणखी वाकलो तर मोडूनच जाईन...हे मला शक्य नाही, परंपरा फार मोलाच्या आहेत...’ त्याच्या या निश्चयात कुणी बदल करू शकत नाही. चित्रपटाच्या शेवटी सगळ्या ज्युइश लोकाना घरदार-गाव सोडूण जावे लागते त्या वेळी मात्र हळवार झालेला ताव्हिये ही मुलगी आणि जावई निरोप घ्यायला येतात तेंव्हा तिला लांबूनच आशीर्वाद देतो...तिला ही त्याने त्याच्या पध्दतीने केलेली क्षमाच आहे हे बाकीच्याना कळते...
हे कथानक मी थोडक्यात पण चित्रपटाला न्याय देत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातील विनोद, बराच तपशील अन् मुख्य अप्रतीम अभिनय यामुळे अविस्मरणीय होणारा हा चित्रपट प्रत्यक्ष पहायला हवा. त्या काळातले उघड प्रदर्शनाशिवाय गृहित धरलेले पतिपत्नीचे प्रेम अन् त्याबरोबर असणारी सुरक्षितता, पित्याचे मुलींवरचे प्रेम, बदलती सामाजिक स्थिती अन् या सर्वातून जाताना होणारी मनाची उलघाल याचे चित्रण परदेशात घर मांडून वेगळ्या संस्कृतीत मुलाना वाढवण्याची कसरत करणाऱ्याना जवळचे वाटावे असेच आहे. पहिल्यांदा हा चित्रपट पाह्यला तेंव्हा मुलीला परदेशी पाठवताना होणारी ताव्हियेची तळमळ पाहून प्रथम इकडे येताना विमानतळावर लाडक्या लेकीला नि पहिल्या नातवाला निरोप देताना गहिवरलेले माझे वडिल त्याच्या जागी दिसले....नंतर बघितला तेंव्हा आणखी काही जाणवलं.....प्रतिकुल परिस्थितीत ते लोक आपले अस्तित्व जपु बघत होते. घराबाहेर धोकाच जास्त, तरीहि आपली संस्कृति नि परंपरा त्यानी सोडल्या नाहीत.आवश्यक तेंव्हा तडजोड जरूर केली.ते पाहून मी खूप शिकले. इथे अमेरिकेत आम्ही जसे आहोत तसे राहू शकतो अन् लोक आमच्या विश्वासांचा आणि श्रद्धांचा आदरच करतात. व्यक्तिस्वातंत्र्य मोलाचं मानणारा हा देश. तुम्ही व्यक्ति म्हणून काय ते लोक महत्वाचं मानतात. आपल्या प्रथा समजावून सांगितल्या की त्याना आनंद होतो. वेगळा पेहेराव,लग्नपद्धती,कपाळावरचं कुंकु याबद्दल स्वाभाविक कुतुहल असते. पण आता जग लहान झाल्याने, दूरदर्शन, संगणकासारख्या गोष्टींमुळे याबद्दलचं अज्ञान दूर होऊन वेगळेपणाबद्दलची भीति नष्ट होतेय. आता सर्वत्र बरेच भारतीय आणि त्यांची दुसरी पिढी सर्व थरांमध्ये मोकळेपणे वावरत असल्याने तुम्ही परत जाणार का अन् कधी? असा प्रश्न कोणी विचारत नाही.

अनेक वर्षे इथे राहिल्यावर इथली संस्कृति समजावून घेता घेता आम्ही आपल्या रुढी,परंपरा याबद्दल विचार करु लागलो. पालक झाल्यावर मुलांच्या प्रश्नांना उचित उत्तरे देता देता तर ते अत्यावश्यक झाले. व्यक्तिस्वातंत्र्याचा वातावरणात वाढणारी मुले कोणतेहि नियम त्यामागची कारणमीमांसा पटल्याशिवाय स्वीकारायला तयार होत नाहीत. त्यामुळे इथे पालकाची भूमिका जबाबदारीने पार पाडायची तर ते नियम आपण समजून घ्यावे लागतात. परंपरांच्या मागचा अर्थ अभ्यासून त्यांची ह्या काळातली गरज,परदेशात या सांभाळण्याचे औचित्य वगैरे कसोट्या लावत अनावश्यक तपशील टाकून देऊन फक्त गाभा मनोभावे जतन करण्याची संवय लावून घ्यावी लागते. घरात पूर्णपणे भारतीय संस्कृति जपत आम्ही इथे राहू शकतो ही भाग्याची गोष्ट आहे.
या देशात नवीन असताना लक्षात आलेली एक प्रथा म्हणजे जेवण सुरु करण्यापूर्वी लोक प्रार्थना म्हणतात नि मग जेवण सुरु करतात. मग आम्हीहि मुलाना भगवत्गीतेतला
’ब्रह्मार्पणम्ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना’

हा श्लोक,आणि त्यापुढे,
हरिर्दाता हरिर्भोक्ता हरीरन्न प्रजापति
हरिर्विप्र शरीरस्तु भुङते भोजयते हरि:

तसेच वदनि कवळ घेता..........आणि जनी भोजनी नाम वाचे वदावे...हेहि म्हणायला शिकवले. मोठ्या मुलाने नातीना शिकवलेय आणि धाकट्या मुलाच्या छोट्याना पण हे हळुहळु कळू लागलय. पानातल्या अन्नावर एकदम तुटुन न पडता क्षणभर जेवण या क्रियेबद्दल विचार करण्याची सवय आपोआप लागते .हल्ली सर्वत्र पानातल्या पदार्थांचा चवीने आस्वाद घेत सावकाश जेवल्यास आपण आवश्यक तेवढच जेवून तृप्त होतो आणि वजन वाढणे टाळता येते असं ऐकतो, वाचतो. पहिल्या श्लोकात जेवण हा एक यज्ञ समजून अन्न,ते खाणारे अन् स्वीकारणारे नि भोजनाची क्रिया हे सारे ब्रह्मच आहे तर् दुसऱ्यात अन्न देणारा,त्याचा उपभोग घेणारा एकच हरि अशी भावना आहे.इथले लोकहि समोरच्या अन्नासाठी देवाला धन्यवाद देऊन जेवण सुरु करतात ते पाह्यल्यावर मुलाना आपली ही पद्धत शिकवणे सोपे गेले.

इथल्या अनेक चांगल्या गोष्टी शिकण्याची संधि इथे राहून मिळाली.मुख्य म्हणजे लोकांसाठी आमच्या रहाणीत नको ते बदल करण्याची गरज भासली नाही. जे प्रगतीसाठी महत्वाचे,खरोखर भल्यासाठी योग्य ते अनुकरण्याची शिकवण आईवडीलांकडून आणि उत्तम शिक्षक लाभल्याने शिक्षणातून मिळाली होती. लहानपणापासून ऐकलेल्या कथापुराणातल्या गोष्टींमधून नीर क्षीर विभेद करण्याचा विवेक लाभलेला, डोळ्यापुढे आदर्शहि चांगले होते. आम्ही उभयता एक विचाराने मुलाना वाढविल्यामुळे आपल्या संस्कृतीचा वारसा त्यांच्या हाती देणे अवघड नव्हते. फक्त ही धडपड लहान गावात म्हणून एकाकी होती. इतर भारतीय मंडळीच उत्तेजन देण्याऐवजी चेष्टेचे उद्गार काढीत. अमेरिकन परिचित मात्र मुले व आम्ही एकाहून अधिक भाषा बोलू शकतो याबद्दल कौतुकच करीत. दोन्ही मुले इथे वाढली तरी मराठी बोलता,लिहिता,वाचता येते याचे अनेकाना नवल वाटते. हल्ली तर मला मराठी मध्ये संगणकावर विशिष्ट जोडाक्षरे लिहायला जमलं नाही तेंव्हा मोठ्या मुलाने मदत करून लहानपणी त्याला मराठी लिहायला शिकवल्याचे सार्थक केले आहे! शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत संस्कृत शिकताना पहिला अर्धा तास बाबांशी, याची काय आवश्यकता आहे,कुणालाच (मित्रांपैकी) हे शिकावं लागत नाही....म्हणून वाद घालणारा हाच मुलगा गीतेतल्या श्लोकांबद्दल बाबांशी खरा अर्थ समजून चर्चा करतो तेंव्हा बाबाना जो आनंद मिळतो तो व्यक्त करायला शब्द नाहीत.
हा समृध्द देश म्हणजे कॅटलॉगचं जग! तुमच्याकडे काय आहे त्यात समाधान मानण्याऐवजी काय नाही अन् ते सर्व घेतल्याने आयुष्य अधिक सुखाचे कसे होईल हे सुचवणारे संदेश सर्वत्र सतत मिळत असतात. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरवताना प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागते. मुले मोठी झाली तसे त्यांचे विचारहि कधीकधी पटवून घ्यावे लागतात. प्रतिकूल परिस्थितीतून आलेले आम्ही दोघे, अनेक गोष्टी असेल त्यात भागवून अवघड मार्गाने करायची सवय अंगवळणी पडलेली. अडून न बसता असे काम चालवून घेणे हा सद्गुण मानणाऱ्यांपैकी. ते नेहमीच शहाणपणाचे नसते हे मुलांनी लक्षात आणून दिले. इथे लोक प्रत्येक कामासाठी योग्य ती हत्यारे,कपडे,बूट ,डोळ्यांचे संरक्षण आवश्यक असते तेंव्हा खास चष्मा इ. वापरतात. त्यामुळे काम करणे सुखकर होऊन कामात सफाई येते. खेळाच्या बाबतीत हे सांभाळल्याने शरीराला दीर्घ काळाने उद्भवणारे आजार टाळता येतात. हे पटल्यामुळे आता सेलवर स्वस्त म्हणुन वस्तू न घेता विचारपूर्वक खरेदी करण्याची सवय लागली. धाकट्याने एकदा असच कोणतेहि काम करण्याची फक्त आपली रीत बरोबर अस समजणं किती चुकीच हे दाखवून दिल्यावर नकळत ही चूक आपण बरेचदा केल्याच जाणवलं. थोडक्यात पालक म्हणून आम्हीहि मुलाना इथे वाढवताना खुप शिकलो, मुख्य म्हणजे चूक मान्य करून योग्य ते बदल आनंदाने करण्याचे उदाहरण त्यांच्यापुढे ठेवण्यात कमीपणा वाटला नाही. या बदलामुळे झालेल्या फायद्याबद्दल त्यांचे कौतुकहि करतो. आता तर दोघेहि महत्वाच्या बाबींमध्ये सल्ला घेण्याइतके मोठे झालेत.

एकूण गेल्या अडतीस वर्षांच्या इथल्या वास्तव्यात स्वत:कडे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघून आवश्यक ते बदल जरूर केले. मात्र विचारात आपल्या संस्कारांचे भान, आचारात पार्श्वभूमीचा अभिमान आणि महत्वाचे निर्णय घेताना मोडेपर्यंत न वाकण्याचे धैर्य सतत आहे!

- मनीषा सु. पंडित, होटन,मिशिगन