४ नोव्हेंबर २००८ ची रात्र काही निराळीच होती। बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हा ती नेहमीची निवडणूक राहिली नव्हती, तर त्यांची निवड ही इतर अनेक गोष्टींची साक्ष होती। यात एका डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्याने रिपब्लीक पार्टीच्या नेत्याला नुसते हरवले नव्हते, तर इथे एक इतिहास रचला जात होता...
बराक ओबामा यांची गेल्या काहीच वर्षातली अमेरिकन राजकारणातली झेप ही त्यांच्या चाणाक्ष बुद्धीची, अफाट वक्तृत्वाची, देशाची पक्की नस ठाऊक असण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची नेमकी जाण असण्याची साक्ष आहे। पण स्वतः ओबामा देखील तुम्हाला सांगतील हा केवळ एका बुद्धीमान माणसाचा एका निवडणूकीतला विजय नाहीये, तर सच्च्या लोकशाहीचा आणि प्रागतिक विचारांचा विजय आहे. ही नांदी आहे २१व्या शतकात येऊ घातलेल्या घटनाक्रमाची, नवीन जग रहाटीची.
१५० वर्षापूर्वी हा देश फाळणीच्या उंबरठ्यावर उभा होता, संपूर्ण देशाला ऐरणीवर आणणारा मुद्दा होता की निव्वळ कातडीचा रंग वेगळा म्हणून आपल्यासारख्याच माणसांवर हुकुमत गाजवायची की नाही। ४० वर्षापूर्वी हाच देश त्याच कातडीच्या लोकांना आपल्या घरांशेजारी घरं घेऊन देण्यावर, त्यांच्या मुलांना आपल्या शाळेत शिकवायला देण्यावर विभागला होता. आणि आज त्याच देशाने ज्याच्या शरीरात अर्धे रक्त त्याच वंशाचे आहे अशा माणसाला प्रचंड बहुमतांनी (पॉप्युलर व्होट असो वा इलेक्टोरल) निवडून दिलं आहे. हा तो असामान्य विजय आहे.
या देशाचा एक स्वभावधर्म खरोखर दृष्ट लागावा असा आहे, तो म्हणजे चूक उघडपणे मान्य करण्याचा आणि तितक्याच चटकन् ती चूक सुधारण्याचा। ख-याखु-या लोकशाहीचा हा जिवंत अविष्कार आहे. ज्या देशाने दोनशे वर्षापूर्वी जगाला लोकशाहीच्या आणि मुलभूत मानवी अधिकारांच्या चिरतरूण व्याख्या दिल्या त्या देशाने हा अविष्कार करावा हे स्वाभाविकच आहे.
पण माझ्यासारख्या बाहेरच्या देशातून तुलनेने नुकत्याच आलेल्या माणसाला यात एवढं भारावून जाण्याचं कारण काय। कारण असं आहे की माझ्या दृष्टीने हा प्रागतिक विचारांचा पुरोगामी विचारांवर मिळवलेला विजय आहे. माझ्यासाठी डोळस मुक्त विचारांनी दूषित पूर्वग्रहांवर केलेली ही मात आहे. बराक ओबामा माझ्यासाठी अभिनव विचारांच्या तरूणांचे प्रतिनिधी आहेत. ते माझ्यासाठी फक्त कृष्णवर्णीय अमेरिकन नाहीत तर ते बहूराष्ट्रीय आहेत. ज्यांचे जन्मदाते वडील केनिया, आफ्रिकेतले आहेत, आई अमेरिकन आहे आणि त्यांचे शालेय शिक्षण त्यांच्या सावत्र वडीलांच्या देशात, इंडोनेशियात झालंय.
त्यांच्या दूरान्वयाने असलेल्या मुस्लीम संबंधाविषयी बरंच काही बोललं गेलं। किंबहूना ब-याच लोकांनी आणि विशेषतः त्यांच्या विरोधकांनी त्याचं विषारी भांडवल करायचाही बराच प्रयत्न केला. माझ्यासाठी ह्या दूरान्वयाने का होईना पण असलेल्या मुस्लीम संबंधानाही महत्व आहे. त्यांनी त्यांना बहूधर्मीय स्वरूपही दिलंय. ज्या काळात या आणि जगभरच्या इतर देशात धर्माधर्मामध्ये भिंती उभ्या केल्या जातायत, त्या काळात बहुधर्मीयतेचं खणखणीत प्रतीक मला मिळालंय.
जेव्हा पूर्वग्रहांचा धुरळा आपली दृष्टी गढूळ बनवतो, किंबहूना आपली दृष्टी अशीच गढूळ राहावी असा ज्यांचा त्यात वैयक्तीक रस असतो ते आपल्याला त्या धुरळ्यात पुन्हा पुन्हा ढकलत असतात अशा वेळी सबंध जगाला अशा सुस्पष्ट खणखणीत प्रतीकांची नितांत आवश्यकता आहे। अमेरिकेलाच काय सबंध जगाला आता मेल्टिंग-पॉट ( “हे विश्वची माझे घर” ) बनायची वेळ आलीय, राष्ट्राराष्ट्रातल्या सीमा जिथे पुसट होत चालल्यात तिथे अशा प्रतीकांची खरी गरज आहे.
म्हणून माझ्यासाठी हा विजय केवळ “निळ्या राज्यांचा”, “लाल राज्यांवर” विजय राहात नाही, त्यापेक्षा खूप पुढे जातो। उद्या आपली मुलं, नातवंडं जेव्हा वळून पाहतील, तेव्हा आपल्याला अभिमानाने सांगता येईल, मी होतो तो इतिहास अनुभवायला. जसा तो आपण अनुभवला होता ९७ साली के.आर्.नारायणन् जेव्हा भारताचे पहिले हरीजन राष्ट्रपती झाले होते तेव्हा. आणि तेव्हाही त्यांनी आपलं हरीजनत्व कधीच पुढे केलं नव्हतं. ओबामांनीपण आपल्या कृष्णवर्णाचं भांडवल कधीच केलं नाही. कारण दोघांनाही दाखवायचं होतं की आम्ही कुठल्या सवलतींमुळे पुढे आलो नाही, तर आलोत आमच्या कतृत्वावर.
१९६३ मध्ये डॉ। मार्टिन ल्युथर किंग यांनी एक स्वप्न पाहिलं होतं... ते म्हणाले, “मी स्वप्न बघतोय माझ्या ४ मुलांचं भवितव्य उद्या त्यांच्या रंगावरून ठरवलं जाणार नाही, तर त्यांच्या अंगभूत गुणांवरुन ते ठरवलं जाईल”. कालचा तो उद्या आज आलाय हे या ठिकाणी सिद्ध झालंय. आता उद्या माझा मुलगा एखाद्या कृष्णवर्णीयाला सहजपणे केवळ रंगामुळे ब्लॅक म्हणू शकेल. त्यामागे 'कल्लू' , 'काळ्या' अशी हिणवणूक असणार नाही. माझ्या मते ही प्रचंड मोठी झेप असेल. धुरळ्यातून स्वच्छ मोकळ्या हवेकडचा तो प्रवास असेल.
मात्र २००८ च्या निवडणूकीविषयीच्या माझ्या ह्या आठवणी दोन गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होवू शकणार नाहीत। पहिली गोष्ट म्हणजे पराभूत उमेदवार जॉन मकेन् यांच्या दिलदार आणि मानपूर्वक पराभव स्वीकारण्यानं. पराभवातही शान कशी राखावी याचं ते उत्कृष्ट उदाहरण होतं.
आणि दुसरी आठवण म्हणजे, ज्या माऊलीने बराक ओबामांना लहानाचं मोठं केलं, जिच्यामुळे आपल्याला आज हा दिवस बघायला मिळाला, ती त्यांची संपूर्णतः श्वेतवर्णीय आजी, आपल्या नातवाचं हे कौतुक करायला या जगात केवळ एक आणखी दिवस थांबू शकली नाही। आपल्याला अंतिम वैश्विक सत्याची विषण्ण जाणीव देऊन गेली. पण त्याचबरोबर आपल्या मनावर ठसवून गेली की, प्रगतीचा वाहता ओघ कधी थांबत नसतो. जेव्हा एक देश बदल करायचा मनापासून ठरवतो, तेव्हा तो झाल्यावाचून राहात नसतो, आणि म्हणूनच ओबामांचा संदेश जागतिक, सर्व सीमांपलीकडे नेऊ शकली... “…WE CAN CHANGE”!!
मयुरेश देशपांडे, अमेरिका
Wednesday, November 12, 2008
Subscribe to:
Posts (Atom)